इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
घोटी पोलीस ठाण्यात कलम 395, 343, 504, 506 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ह्या गुन्ह्यातील आरोपीतांनी किंगफिशर स्ट्रॉंग बीयरचे 2200 बॉक्स चोरी केले आहे. सदरचे बियर बॉक्स आरोपीतांनी नाशिक जिल्ह्यात अथवा बाहेर जिल्ह्यात विक्री केल्याचा संशय आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, किंगफिशर बिअर 650 मिलीच्या 12 बाटल्यांचे बॉक्स, बॅच नंबर KFS 264 10/2022 व बॅच न. KFS 266 10/2022 असे जवळच्या दुकानावर किंवा अन्य ठिकाणी विक्रीस, आरोपीतांनी किंगफिशर बिअर बॉक्स ठेवलेल्या ठिकाणाबाबत, आरोपी बाबत, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांबाबत कोणास काही माहित असल्यास तात्काळ घोटी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर मोबाईल क्रमांक 9309028177, घोटी पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक 02553-220544 ह्यावर संपर्क साधावा. माहिती कळविणाऱ्या नागरीकांचे नावे गुप्त ठेवल्या जातील असे आवाहन करण्यात आले आहे.
ह्या गुन्ह्यात आरोपीतांनी फिर्यादीचा कंटेनर क्र. एमएच 43 बीजी 5463 मध्ये गंगापुर जि.औरंगाबाद येथुन बसुन सिन्नरच्या पुढे आल्यावर शिवीगाळ, दमदाटी केली. हा कंटेनर नाशिकरोड व सिन्नर असा फिरवुन आणुन सिन्नर घोटी रोडला एचपी. पेट्रोलपंपाजवळ उभा केला. नंतर आर्टिका गाडी एमएच 04 एफएफ 6351 मधुन आलेल्या आणखी साथीदारांनी फिर्यादीचे तोंडाला रुमाल लावुन बेशुध्द करुन त्याचे ताब्यातील कंटेनर व त्यातील किंगफिशर बियरचे 2200 बॉक्स घेवुन जावुन फिर्यादीला नाशिक येथे डांबुन ठेवले. नंतर पुन्हा हरसुलजवळ एका ठिकाणी घेवुन जावुन कंन्टेनर मधील बियरचे बॉक्स खाली करुन 20 लाख रुपयाचा कंटेनर व 43 लाख 29 हजार 856 रुपयाचे किंगफिशर 2200 बियरचे बॉक्स असा एकुण 63 लाख 29 हजार 856 रुपयाचा माल बळजबरीने चोरी करुन घेवुन गेले. ह्या गुन्ह्याचा तपास घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत असून याबाबत काहीही माहित असल्यास नागरिकांनी न घाबरता माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.