
इगतपुरीनामा न्यूज – रासायनिक खते कंपनीकडून युरिया सोबत होत असलेली लिंकिंग बंद करावी या मागणीचे पत्र राष्ट्रवादीचे नाशिक कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंढे यांच्याकडे केली आहे. एक वर्षापासून सर्व कंपन्या युरिया सोबत इतर दाणेदार खते लिंक करून विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात देतात. युरिया गोणीसोबत रासायनिक खताची गोण किवा इतर साहित्य लिंक केले जाते, अन्यथा सदर विक्रेत्यास युरिया मिळत नाही किंवा त्या सोबतचे दाणेदार खते व इतर साहित्य विक्रेत्याकडे तसेच पडून राहते. यामुळे विक्रेत्याचे खूप मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतून राहते. इगतपुरी तालुक्यात भात शेती जास्त असल्याने सर्व भाग आदिवासी ग्रामीण आहे. त्यामुळे युरियाची मागणी जास्त आहे. विक्रेत्यांनी युरिया सोबत रासायनिक खताची विक्री केल्यास शेतकऱ्यांच्या नजरेत विक्रेता दोषी ठरतो. यामुळे दुकानात खूप जास्त प्रमाणात वाद होतात. यामुळे ह्याबद्धल शेतकऱ्यांचे आणि विक्रेत्यांचे वाद वाढले आहेत. या सर्व विषयाची माहिती घेऊन युरिया सोबतची लिंकिंग बंद करण्यात यावी किंवा युरीयाला कोणतेही खत लिंक न करता खत पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा असे पत्रात नमूद आहे. यावेळी माजी आमदार शिवराम झोले हजर होते.
