स्व. इंदुमती ( आईसाहेब ) गुळवे : विकासाचे रामराज्य घडवणारे हिमालयाच्या उंचीचे उत्तुंग व्यक्तिमत्व

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा

लाखो दीनदुबळ्या लोकांची सेवा, गावोगावी विकासाचे पर्व, शिक्षणाची ज्ञानधारा, हजारो कार्यकर्त्यांची घडवणूक आणि अनेक कुटुंबांना हक्काची भाकरी मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असे लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे सर्वांच्या मनामनात आहेत. हे सगळं विकासाचे विश्व उभे करणाऱ्या स्व. दादासाहेबांच्या नंतर त्यांचे सुपुत्र ऍड. संदीप गुळवे यांच्याही सर्वच प्रेरणादायी यशात सिंहाचा वाटा असणारे हिमालयापेक्षा उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे स्व. इंदुमती ( आईसाहेब ) गोपाळराव गुळवे ह्या आहेत. त्यांच्या पाठीशी असण्यामुळे इगतपुरी आणि संपूर्ण जिल्हाभर गुळवे परिवाराने विविध क्षेत्रातील व्यापक कार्याचा हिमालय उभा केलेला आहे. निगर्वी, निरपेक्ष, निर्व्याज असणारे हे व्यक्तिमत्व एक वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेले. ह्यामुळे विकासपर्वाला घडवणारे त्यांच्यासारखे पाठीराखे व्यक्तिमत्व आपल्यात नसल्याची खंत सातत्याने मनाला सलत आहे. असे असले तरी त्यांच्या कौशल्यदायी व्रतस्थ कार्याच्या दीपस्तंभामुळे स्व. आईसाहेब आपल्यातच आहेत असे म्हणायला हरकत नाही.

जगामध्ये यश मिळवून भरारी घेणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांच्या यशात नक्कीच एखादे देवतुल्य व्यक्तिमत्व असतेच. स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांनी विविध क्षेत्रात केलेली उत्तुंग कामगिरी, जनसेवा आणि विकासाचे उभे केलेले रामराज्य ही देणगी आपल्याला स्व. इंदूताई ( आईसाहेब ) यांच्यामुळेच मिळू शकली. त्यांचा भरभक्कम आधार स्व. दादासाहेबांना मिळाला नसता तर एवढे मोठे कार्य कधीही उभे राहू शकले नसते ही काळ्या दगडावरची रेघ आहे. स्व. दादासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याची धुरा त्यांच्याकडे आली. त्यांनी ही जबाबदारी लीलया पेलून ऍड. संदीप गुळवे यांचे बहुआयामी नेतृत्व निर्माण केले. दादासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी वारसदार आपल्या सर्वांना दिला. खेडोपाडी गुळवे परिवारावर निष्ठा ठेवून समाजसेवा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना हक्काने बोलावून त्यांची विचारपूस आणि काळजी घेणाऱ्या आईसाहेब आपल्यात नाही असे मनाला अजिबात पटत नाही.

स्व. इंदुमती ( आईसाहेब ) यांनी सलग १३ वर्ष इगतपुरी पंचायत समितीचे सदस्यपद भूषवले. नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदावर कार्यरत असतांना एक महिला सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी करू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती म्हणून काम करतांना शेतकरी हितासाठी त्यांनी जीवाचे रान करून कोट्यवधींची कामे करून घेतली. इगतपुरीसारख्या अतिदुर्गम आदिवासी तालुक्यात ज्ञानधारा देणाऱ्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. आयुष्याच्या अखेरपर्यंत जनमानसाच्या समस्या सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आपल्यामध्ये वर्षानुवर्षे दरवळ निर्माण करून आईसाहेब आपल्यातच असल्याची अनुभुती देणारा आहे. आईसाहेब, तुम्ही पुन्हा जन्माला या आणि सर्वत्र आपल्या कुशलतेने रामराज्य निर्माण करा अशी परमेश्वराकडे प्रार्थना…!

Similar Posts

error: Content is protected !!