

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची दशा खूपच केविलवाणी झाली आहे. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. स्वराज्यचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. घोटी सिन्नर महामार्गावर खराब रस्त्याचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त करण्यात आला. समृद्धी महामार्गामुळे रस्त्याची वाट लागली आहे. वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत या रस्त्यावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सरकारला जागे करण्यासाठी तालुक्यातील स्वराज्य संघटनेने घोटी सिन्नर महामार्गावरील खड्ड्यांची पूजा करून श्राद्ध घातले. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची घोषणाबाजी केली. आंदोलनात वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जुनवणेवाडीच्या रस्त्यामुळे जीव गमावलेल्या महिलेला श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वराज व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण जाधव, उपजिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, तालुकाध्यक्ष नारायण भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, सहकार तालुकाध्यक्ष हरीश कुंदे, घोटी गटप्रमुख बाळू सुरुडे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष शिवाजी काजळे, शिरसाठे गटप्रमुख योगेश शिंगोटे, उमेश सुरुडे, कृष्णा गभाले आदी उपस्थित होते.