मुलांना उभारी देण्यासाठीच किशोर कादंबरीची निर्मिती : पुरस्कारार्थीच्या मेळाव्यात संजय वाघ यांचे प्रतिपादन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

चौकोनी कुटुंब पद्धतीच्या हव्यासापायी निर्माण झालेल्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सर्वाधिक नुकसान बालकांचे झाले आहे. आजी-आजोबांकडून होणाऱ्या संस्काराला पारख्या झालेल्या मुलांना उभारी देण्यासाठीच ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीची निर्मिती केल्याचे मत बालसाहित्यिक संजय वाघ यांनी नोंदविले. साहित्य अकादमीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पुरस्कारार्थी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाघ यांनी आपला लेखन प्रवास उलगडून सांगितला. अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक होते. सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी स्वागतपर भाषण केले. याप्रसंगी देशभरातील २२ भाषेतील पुरस्कार विजेत्या लेखकांनी त्यांचे सर्जनशील अनुभव सांगितले. यानंतर अकादमीचे उपाध्यक्ष कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटनपर सत्र पार पडले. बंगाली कवी डॉ. सुबोध सरकार यांनी प्रास्ताविक केले. बाललेखक बलराम बसाक यांनी बंगाली साहित्याचा इतिहास आणि सद्यस्थिती उद्धृत केली.

यावेळी इंग्रजी कवयित्री डॉ. संजुक्ता दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय भाषांमधील बालसाहित्य’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यात दिपनविता रॉय (बंगाली), मधुरिमा विद्यार्थी (इंग्रजी), दिविक रमेश (हिंदी), डॉ. यल्लाप्पा के.के. पुरा (कन्नड), स्वाती राजे (मराठी), बिरेंद्र मोहंती (ओडिया) आणि डॉ. पत्तीपाका मोहन (तेलुगू), सुप्रसिद्ध सत्रात बाल साहित्यिकांनी आपापल्या भाषेत शोधनिबंध सादर केले. स्वाती राजे यांनी मराठीतील बालसाहित्याच्या विकासावर भाष्य करताना लेखकांनी जागतिक आशय आणि स्थानिक साहित्य यांच्यात समतोल राखला पाहिजे, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन साहित्य अकादमी इस्टर्नचे प्रादेशिक सचिव डॉ. देवेंद्रकुमार देवेश यांनी केले. येत्या तीन वर्षात टीव्ही चॅनलवरील बाल मनोरंजनाच्या कार्यक्रमांची सद्दी संपणार असून आगामी दहा वर्षांत बालसाहित्याला सुदिन येणार असे भाकीत साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक यांनी वर्तविले. यंदा अकादमीचा बहुमान प्राप्त झालेल्या सर्व साहित्यकृतीचे २४ भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार असल्याची घोषणाही कौशिक यांनी यावेळी केली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!