गोरख बोडके यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर निवड : सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद इगतपुरी तालुक्याला लाभले दुसऱ्यांदा : – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र

इगतपुरीनामा न्यूज – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाशिकचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडील. या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कार्य करण्यावर भर देणार आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडून सोपवलेली जबाबदारी जनकल्याण आणि पक्षबांधणीसाठी उपयोगी ठरेल असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आज गोरख बोडके यांना नाशिकचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केल्याचे नियुक्तीपत्र सुपूर्द केले. मंत्री ना. छगनराव भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले यावेळी उपस्थित होते. निवडीचे वृत्त समजताच इगतपुरी तालुक्यासह जिल्हाभरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद गोरख बोडके यांच्या रूपाने इगतपुरी तालुक्याला दुसऱ्यांदा लाभले असून लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांनी सत्ताधारी पक्षाचे पहिल्यांदा जिल्हाध्यक्षपद भूषवलेले आहे.

माजी उपमुख्यमंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनातून गोरख बोडके हे राजकारणात दाखल झालेले आहेत. शिरसाठे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी मोठे कार्य केलेले आहे. बाजार समिती उपसभापती, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. यासह सौभाग्यवती अनिता बोडके यांना सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात निवडून आणत सरस नेतृत्व सिद्ध करून दाखवले. कोरोनाच्या भयानक काळात सक्रिय राहून जनकल्याण, रुग्णसेवा, मोफत औषधे, ऑक्सिजन पुरवठा, रुग्णखाटा आदी लोकोपयोगी कार्याचा परिपाठ घालून दिलेला आहे. शिरसाठे गटासह संपूर्ण इगतपुरी तालुक्यात विविध विकासाची कोट्यावधी रुपयांची कामे गोरख बोडके यांच्या माध्यमातून झालेली आहेत. इगतपुरी तालुक्यातील बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सहकारी सोसायट्या आदींमध्ये श्री. बोडके यांचे बावनकशी नेतृत्व दिसून आले आहे. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या ते सांभाळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर त्यांची सार्थ निवड झाली असल्याची प्रतिक्रिया जिल्हाभरात व्यक्त होत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!