इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
१२ महिने २४ तास आपल्या कार्यकर्तृत्वाने लोकांच्या मनामनात अधिराज्य गाजवणे अजिबात सोपे नाही. अन त्यांच्या मेंदूत प्रत्येक क्षणाला फक्त लोककल्याणाचा विचार सुरू असतो. त्यामुळेच अनेक लोकांच्या हृदयात त्यांनी आपले स्थान आपल्या भरभक्कम कार्याने अबाधित केले आहे. असे दिलखुलास व्यक्तिमत्व तथा जिल्हा नियोजन समितीचे नूतन सदस्य गोरख बोडके आजपासून “जननायक” म्हणून ओळखले जाणार आहेत. इगतपुरी तालुक्यातील टिटोली गावासाठी विविध योजनांद्वारे गावाला सातत्याने साहाय्य करणाऱ्या गोरख बोडके यांना गावाने “जननायक” पदवी बहाल केली आहे. सरपंच अनिल भोपे यांनी गावकऱ्यांनी सर्वानुमते दिलेल्या पदवीचे वितरण आज शिवजयंतीच्या मंगल पर्वावर गोरख बोडके यांना करण्यात आले.
टिटोली गावासाठी व्यायामशाळा, देखणे ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह अशी अनेकानेक विकासकामे करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आपला मतदारसंघ आणि मतदारसंघात टिटोली गाव नसतांना गोरख बोडके नेहमीच गावाला साथ देत असतात. गावासाठी अनेक विकासकामे करीत असताना उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला सुद्धा त्यांना भरीव आर्थिक पाठबळ दिले आहे. प्रशासकिय आणि अनेक प्रकारचे तांत्रिक साहाय्य कायम टिटोली ग्रामपंचायतीला ते करीत असतात. मागील महिन्यात टिटोली ग्रामपंचायतीने सर्वानुमते ठराव करून गोरख बोडके यांना “जननायक” पदवी देण्याबाबत ठराव मंजूर केला. त्यानुसार विशेष स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तयार करण्यात आले. आज शिवजन्मोत्सवाच्या मंगल पर्वावर नूतन जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांना “जननायक” ही उपाधी बहाल करण्यात आली. ह्या कार्यक्रमाप्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, पीके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, टिटोलीचे सरपंच अनिल भोपे, डॉ. एस, डी, जगताप, विनोद भागडे, माजी सरपंच हरिष चव्हाण, भालचंद्र भागडे, नामदेव भागडे, योगेश भागडे, तानाजी बोंडे, मंगेश बोंडे, सुनील बोंडे, भरत हाडप आदींसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.