इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथील गरोदर महिला वनिता भाऊ भगत हिचा पायपीट केल्यामुळे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन मृत्युला जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारावकर यांना देण्यात आले. जुनवणेवाडी, तळोघ, ता. इगतपुरी येथील वनिता भाऊ भगत ही दुर्दैवी महिला गरोदर असल्याने प्रसूतीसाठी मध्यरात्री जुनवणेवाडी पासून पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने अक्षरक्षः डोली करून तिला तळोघ पर्यंत आणले. परंतु हे अंतर साधारणतः ३ कि मी असून तळोघ गावातही आरोग्याची व्यवस्था नसल्याने ह्या महिलेचा मृत्यु झालेला आहे. इगतपुरी तालुक्यात असे अनेक वाड्या पाड्या आहेत की तेथे आजही पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे अशा असंख्य महिलांना आपला जीव गमवावा लागत आहे.
महिलेसह तिच्या बाळाच्या मृत्युला शासकीय अधिकारी हेच जबाबदार आहेत. गरोदरपणापासुन ते प्रसूतीपर्यंत काळजी घेण्यासाठी आवश्यक अधिकारी यांची नेमणुक शासनाने केलेली आहे. परंतु ही शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. जुनवणेवाडी ते तळोघ हा रस्ता उपलब्ध नसल्याने सदरचा रस्ता मंजुर करावा. महिलेच्या वारसांना भरपाई देण्यात यावी. आरोग्य यंत्रणेचे अधिकारी, बांधकाम अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा १० दिवसांच्या आत दाखल करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष रामदास आडोळे, प्रताप जाखेरे, निलेश जोशी, राजेश राखेचा, शहराध्यक्ष सुमित बोधक, राज जावरे, अर्जुन कर्पे, अमित जाखेरे, अविनाश कडु, अमोल क्षिरसागर, लखन लंगडे, आकाश गोईकने, नरेंद्र लंगडे, रोशन हांडोरे, मयुर लंगडे, पुरुषोत्तम दुर्वेकर, तेजस लंगडे आदी उपस्थित होते.