इगतपुरीनामा न्यूज – भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या पार्श्वभुमीवर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी इगतपुरी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष हजर होते. बैठकीमध्ये तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण
कार्यक्रमाची जानेवारी २०२४ च्या वेळापत्रकाची सविस्तर माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून पडताळणी करणार आहेत. यात नोंदणी न केलेले पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती आदी कामे केली जातील. पडताळणी कामकाजासाठी राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमण्याबाबत आवाहन करण्यात आले.
१७ ऑक्टोबरला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ह्या यादीमध्ये काही दुरुस्ती, नावे वगळणी करणे, नावे समाविष्ट करणे यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येईल. नंतर ५ जानेवारी २०२४ ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. नागरिकांनी अधिकाधिक मतदार नाव नोंदणी करावी यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महिला, दिव्यांग, आदिवासी जमात, भटक्या जमाती यांच्यासाठी विशेष मतदान नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जनजागृती करणे, तरुण मतदार १८ ते १९ वर्ष वय पुर्ण झालेले नवीन मतदार व सर्व वंचित घटकांतील सर्वांनी मतदान यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन सहाय्य्क मतदार नोंदणी अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी केले आहे.