विद्यार्थी, नागरिक ओलांडतात जीवघेणा रेल्वे ट्रॅक : उड्डाण पूलाच्या मागणीकडे रेल्वेचे दुर्लक्ष

इगतपुरीनामा न्यूज – रेल्वे मंत्रालयाने इगतपुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश केला असून यामुळे इगतपुरी रेल्वे स्थानकाचा विकास होणार आहे. मात्र दुसरीकडे इगतपुरी रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटरवर असलेले पिंप्री गेट रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता १९८० साली बंद केले तेव्हापासून नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रेल्वे गेटवर उड्डाण पुल व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्राचे ज्येष्ठ नागरिक कैलाश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, इगतपुरी खालचीपेठचे रेल्वेगेट २५/३० वर्षापासुन बंद केले असुन त्यास पर्यायी दुसरा रस्ता दिलेला नाही. त्यामूळे रेल्वेने ओव्हर ब्रिज बांधून द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली आहे.

विशेष म्हणजे रेल्वे फाटकाचे दक्षिण बाजुला मुस्लीम धर्मियांचे कब्रस्तान आहे. रेल्वेच्या उत्तर कडेला हिंदू स्मशान भुमी असल्याने नागरिकांना हिंदु समाजाची अंत्ययात्रा तसेच मुस्लीम जनाजा रेल्वे ट्रॅकवरून घेवून जावे लागत आहे. शेतकरी वर्गास आपली शेती अवजारे, ट्रॅक्टर ट्रॉली शेतावर आणण्यास व नेण्यांस रेल्वेला वळसा घालून ५ किमी अंतर फिरुन जावे लागत आहे. यात १०० ते १५० रुपये रिक्षा भाडे  लागतेविद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज, दवाखान्यात येण्या जाण्यासाठी जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅक वरून जावे लागत आहे. बस स्टॅन्ड समोर असलेल्या रेल्वे पाईपलाईन या ठिकाणी भवानी नगर, जुना गांवठा, नवीन गावठा, रामनगर, राजवाडा, मिलींदनगर, सह्याद्रीनगर, शिवाजीनगर अशा वस्त्या आहेत. याच रेल्वे गेटच्या पलीकडे तळोशी, पिंप्री, भावली, बोर्ली, व्यंकटेशनगर, नांदगांव सदो आदी गावे आहेत. गेल्या दहा वर्षांपूर्वी या रेल्वे गेटवर खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते उड्डाण पुलाच्या कामाचे भुमिपुजनही करण्यात आले होते. मात्र भुमिपुजन होऊन प्रत्यक्ष कामाला आजपर्यंत सुरुवात झाली नाही.

उड्डाण पूल झाल्यास खालचीपेठ, हॉलीडे होम, एईएन ऑफिस, मध्य रेल्वे कार्यालय, रेल्वे प्रवाशी तसेच गावातील नागरीक विद्यार्थी व रेल्वे कामगारांना रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी येण्या जाण्यास मार्ग मोकळा होईल. शाळा कॉलेज, तसेच कामगारांना येण्या जाण्याची सूविधा होईल. रनिंग रुम, रेल्वे कॉलनीतील लोकांना तसेच रिटायर्ड नागरीकांना, रेल्वे कर्मचा-यांना शिवाजी नगर, सह्याद्री नगर, मिलिंद नगर, पुलिस लाईन, पाण्याची टाकी येथील रहिवाश्यांना पण येण्या जाण्यांची सूविधा मिळेल. या रेल्वे गेटवर तात्काळ उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी कैलास विश्वकर्मा, भाऊसाहेब खातळे, भगवान पाटील, सुनिल जाधव, भगवान खानळे, रमेश खातळे, नितीन गुळवे, गौतम गरुड, सुनिल खातळे, जाकीर शेख, बाळासाहेब चव्हाण, विजय गोसावी, बबन म्हसणे, संजय खातळे, देवीदास जाधव, मोहन गोवर्धने, जनाबाई खातळे, संतोष शिरसाठ, गणपत खातळे, साहेबराव उबाळे, राजेंद्र खातळे, राम जगताप, नरेश पवार आदींनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!