पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे धामडकीवाडी, भगतवाडी शाळेत पर्यावरणपूरक होळी : फुलांची मनसोक्त उधळण आणि विविध सामाजिक उपक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

बालगोपाळांचा अत्यंत आवडीचा सण म्हणजे होळी..सणाच्या निमित्ताने गोड पदार्थांवर ताव मारून पिचकाऱ्यांमधून एकमेकांवर रंग उडवण्यासाठी बच्चे कंपनी आतुर असते. ह्यामध्येच कोरोना महामारीमुळे होळी सणाचा आनंद अनेकांना घेता आला नाही. महामारीमुळे उत्पन्नावर सुद्धा दूरगामी परिणाम झाल्याने त्याचा फटका होळीच्या उत्साहाला बसला. अशा पार्श्वभूमीवर मुंबई येथील पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या मदतीने इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी आणि भगतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत शानदार होळी उत्सव साजरा करण्यात आला. होळीसाठी झाडांची तोड, पाण्याचा अपव्यय न करता पर्यावरणपूरक होळी साजरी झाली. फाउंडेशनच्या सदस्यांसमवेत विद्यार्थ्यांनी फुलांची उधळण केली. पर्यावरणपूरक सण साजरा केल्याने अत्यंत आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.

होळीच्या अग्निसोबत जे चुकीचे आहे ते जळून नष्ट होवो, कोरोना भस्मसात होवो, गरिबी जाऊन समृद्धी येवो, अभ्यासात येणारा व्यत्यय नाश होवो अशा घोषणा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दिल्या. पेहेचान प्रगती फाउंडेशन मुंबईतर्फे होळी सणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामडकी व भगतवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना पुरी भाजी व फळे वाटप करण्यात आली. ह्या कार्यक्रमांत पेहेचान प्रगती फाउंडेशन मुंबईच्या प्रगती अजमेरा, इंदू झुनझुनवाला, मधू तोष्णीवाल, परवीन रहलान, संगीता गुप्ता, पूजा गगवाणी, विणा जालन, गुरुदेव, क्रिष्णा सिंघानिया, सुनीता बैद, गायत्री दालमिया यांनी सहभाग घेतला. पेहेचान प्रगती सदस्यांनी शालेय आवारात पर्यावरण पूरक होळी पेटवून पर्यावरण रक्षणाचे महत्व समजावून दिले. विद्यार्थ्यांसोबत फुलांची मनसोक्त उधळण करण्यात आली.

भगतवाडी येथील रंजना भगत या गरीब आदिवासी कुटुंबातील मुलीच्या विवाहानिमित्त लग्नाचा शृंगार व संसारोपयोगी, कपाट साहित्य फाउंडेशनच्या सदस्यांनी भेट दिले. खेड जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी कार्यक्रमावेळी भेट दिली. पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सदस्यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, वृषाली आहेर, सौरभ अहिरराव, दत्तू निसरड, गोकुळ आगिवले, रामचंद्र आगिवले, कान्हू भगत, यमुनाबाई भगत, संतोष भगत उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!