रांजणगिरी किल्ल्यावर शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेची स्वच्छता मोहीम

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
इगतपुरी तालुक्यातील शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेची अठ्ठावीसावी दुर्ग संवर्धन मोहीम आज मुळेगाव जातेगाव येथील रांजणगिरी किल्ल्यावर पार पडली. या मोहिमेमध्ये किल्ल्यावरील दोन पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या. या टाक्यांमधून चार ते पाच ट्रॅक्टर माती आणि काही प्रमाणात दगड बाहेर काढून टाकी स्वच्छ करण्यात आली. या मोहिमेसाठी राम दाते, विजय महाले, किसन थोरात, गणेश कातोरे, शेखर चव्हाण आणि श्याम गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. नाशिक शहर हे प्राचीन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणू बंदरात उतरलेला माल जव्हार – गोंडाघाट – अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या व्यापारीमार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर त्र्यंबकगड, बसगड ( भास्करगड।), हर्षगड, रांजणगिरी, अंजनेरी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.

रांजणगिरीच्या दक्षिण टोकाला असलेल्या सुळक्याचा आकार रांजणासारखा असल्यामुळे या किल्ल्याला “रांजणगिरी” हे नाव पडले असावे. या किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज आज अस्तित्वात नाहीत. आडव्या पसरलेल्या या गडावर पाण्याची दोन टाकं आहेत. गडावर प्रवेश करण्यापूर्वी रांजणासारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या सुळक्याला वळसा घालून जावे लागते. गिर्यारोहणाचे प्राथमिक तंत्र वापरुन हा सुळका सर करता येतो.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!