स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी या घटकाचे महत्व

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा अभ्यास घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याची तयारी कशी करावी हे सांगणारा हा लेख

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३

चालू घडामोडींचे महत्व
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी या अभ्यास घटकाचे महत्व अनन्यसाधाऱण असे आहे. परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा घटक अवघड जातो. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, टीव्ही आणि आकाशवाणीवरील प्रसारित होणाऱ्या बातम्यांच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष. तसेच योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे होय.

वाचनाचा अभाव
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना विविधांगी वाचनाची आवश्यकता असते. हे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाकारता कामा नये. वाचनामुळे भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. एखाद्या घडणाऱ्या घटनेचे मूल्यमापन कसे करावे, त्यातील दोन्ही बाजूंचे समर्थन अथवा त्यातील उणिवा यासंदर्भात विचार मांडता येणे आवश्यक असते. या वाचनाचा उपयोग पूर्व परीक्षा, मुख्यपरीक्षा, मुलाखत यासाठी होत असतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. या अर्थाने या अभ्यास घटकाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

सर्व क्षेत्रांचा विचार
चालू घडामोडी या अभ्यासघटकाची तयारी करताना
०१. विज्ञान -तंत्रज्ञान
०२. कृषी क्षेत्र
०३. साहित्य – कला
०४. क्रीडा
०५. समाजकारण
०६. राजकारण
०७. महत्त्वाचे करार ,परिषदा
०८. निवड- नियुक्ती
०९. पुरस्कार
१०. संरक्षण क्षेत्र
११. नवे नियम
१२. सरकारच्या योजना
१३. शैक्षणिक घडामोडी
१४. पोलीस दलातील घडामोडी
१५. आंतरराष्ट्रीय – राष्ट्रीय विक्रम
१६. औद्योगिक
१७. सांस्कृतिक
१८. भौगोलिक
१९. खगोलशास्त्रीय
२०. माहिती आणि तंत्रज्ञान
आदी सर्व क्षेत्रांचा विचार करणे गरजेचे असते. विद्यार्थी ठराविक क्षेत्रांचाच विचार करतात. असे केल्यास सर्वांगीण अभ्यास होत नाही. आणि मग आपण स्पर्धेत कमी पडतो.

वर्तमानपत्र महत्वाचे साधन
चालू घडामोडी या अभ्यासघटकाची तयारी करण्यासाठी सर्वात महत्वाचे साधन म्हणजे रोजचे वर्तमानपत्र होय. चांगल्या वर्तमानपत्राचे विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडतेच. त्याचबरोबर घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, विचार करण्याची पद्धती, घडलेल्या घटनेबद्दलचे स्वतःचे मत, इतरांची मते, चांगले कोणते ?, वाईट कोणते ? अशा अनेक गोष्टी आपण या वाचनातून आपण शिकत असतो.

टिपणवहीची आवश्यकता
वर्तमानपत्रांचे वाचन करताना ०१. आंतरराष्ट्रीय ०२. राष्ट्रीय व ०३. राज्यातील चालू घडामोडीचा विचार करणे आवश्यक आहे. हे वाचन करतांना विद्यार्थ्याने त्या घटनेचे वहीमध्ये टिपण केल्यास अतिशय चांगली तयारी होऊ शकते. हे टिपण दोन पध्दतीने तयार करता येते. ०१. प्रश्नोत्तर स्वरूपात आणि ०२. ठळक नोंदी. अशाप्रकारे स्वतः हे अभ्यास साहित्य तयार केलेले असल्यामुळे चांगले लक्षात राहते. पाठ करावे लागत नाही. परीक्षेला जाताना एक वाचन केले तरी चांगली तयारी होते. त्यामुळे हा घटक अतिशय सोपा जातो हे लक्षात घ्या.

उपयुक्त अभ्यास साहित्य
या अभ्यास घटकासाठी विद्यार्थ्यांना आज भरपूर अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. या साहित्याचा निश्चित उपयोग होऊ शकेल. ते असे : ०१. स्पर्धा परीक्षांची प्रसिद्ध झालेली मासिके ०२. वृत्तपत्रांचे जुने अंक ०३. अनेक प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेली चालू घडामोडींची वार्षिके ०४. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शकांनी लिहिलेल्या चालू घडामोडींच्या पुस्तिका

याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यास साहित्याची निवड करून या घटकाची चांगल्याप्रकारे तयारी करता येते.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक आहेत. )