
इगतपुरीनामा न्यूज – अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडलेले आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्या येण्याचे प्रचंड हाल सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी वळसे घालून फेरा मारावा लागतो. परिणामी शेतीच्या उत्पन्नावर सुद्धा मोठा दुष्परिणाम झालेला आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्या रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत अनेक त्रस्त शेतकरी कुटुंबे पुलाखाली मुक्काम करून बिऱ्हाड आंदोलन करणार आहेत. ह्या आंदोलनाला ह्या भागातील वैतागलेल्या लोकांकडून साहाय्य मिळणार आहे. जोपर्यंत पुलाचे काम होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. एकतर पुलाचे काम पूर्ण करा अथवा तिथून वाहणाऱ्या पाण्यात आम्हालाही वाहून जाऊ द्या अशी मागणी बेलगांव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष सुखदेव गुळवे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी केली असून उद्या गुरुवारी सकाळी आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. या भागातील शेतकरी पत्रकार विक्रम पासलकर, माजी सरपंच बाजीराव गोहाड, कैलास संधान, गोकुळ गुळवे, कोंडाजी गुळवे, राजाराम पासलकर, राजाराम गायकर, बंडू धोंगडे, ज्ञानेश्वर कोकणे, विलास संधान, नाना भोर, बाळू मुसळे, सुरेश कोकणे, बाळू पासलकर, कृष्णा कोकणे, ज्ञानेश्वर संधान, प्रकाश पासलकर, एकनाथ भोर आदींचे संपूर्ण कुटुंब छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी सकाळी १ जुनपासून बिऱ्हाड आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन आक्रमक होईल अशी शक्यता आहे.