
इगतपुरीनामा न्यूज – एकेकाळी आरोग्यसेवेचा आदर्श असणारे इगतपुरी येथील रेल्वे रुग्णालयाची दूरवस्था झाली आहे. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनीने १ मार्च १९२३ रोजी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हे रुग्णालय बांधले. सर चार्ल्स आर्मस्ट्राँग, नाइट, कंपनीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत लेडी हेपर यांनी उद्घाटन केले होते. ह्या रुग्णालयाच्या इमारतीचा ५ जुलै १९२० ला पायाभरणी कार्यक्रम झाला होता. शतकापूर्वीचे चकचकीत फलक ह्या रुग्णालयाच्या मुख्य कॉरिडॉरवर अभिमानाने लावण्यात आले आहेत. सात एकरांहून अधिक जागेवर वसलेले हे रुग्णालय फार पूर्वीपासून केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे कंपनी म्हणजेच आजच्या भारतीय रेल्वेच्या मूळ संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि उदार संस्था म्हणून काम करत होते. ह्या ठिकाणी १९१८ मध्ये एक छोटा दवाखाना सुरू झाला. याचे नेतृत्व ब्रिटिश अधिकाऱ्याऐवजी एका भारतीयावर म्हणजे सहाय्यक सर्जन असणारे डॉ. एस. सी. बिस्वास यांच्यावर होती.
रुग्णालयाचे एक निवृत्त कर्मचारी म्हणाले की “मी १९८४ मध्ये फार्मासिस्ट म्हणून रुजू झालो, तेव्हा हे रुग्णालय आपल्या वैभवात होते. येथे ७० खाटा, १३ डॉक्टर्स, वेगवेगळ्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि एकूण १७० कर्मचारी होते. पण आता हे रुग्णालय अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. आम्ही ही परिस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ध्यानात आणली, पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.” ते पुढे म्हणाले की, “५ हजाराहून अधिक कर्मचारी आणि इगतपुरीच्या १२७ खेड्यांतील लोक या रुग्णालयावर अवलंबून आहेत. आता परिस्थिती इतकी खराब आहे की साध्या टाक्यांचा उपचारही येथे होऊ शकत नाही. इगतपुरी हे घाट व डोंगरी क्षेत्रात असल्याने अपघात खूप प्रमाणात होत असतात. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे सरकारी ट्रॉमा सेंटरची तातडीची गरज आहे, कारण किरकोळ किंवा गंभीर उपचारांसाठी इगतपुरीचे रहिवासी नाशिकवर अवलंबून आहेत. आपत्कालीन वैद्यकीय उपचारांसाठी पूर्णपणे नाशिक शहरावर अवलंबून राहावे लागते. येथे कोणतेही खासगी किंवा सरकारी रुग्णालय विशेष वैद्यकीय सेवा देत नाही. ग्रामीण रुग्णालयातही कोणत्याही आपत्कालीन रुग्णांवर उपचार केला जात नाही.
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सचिव अतुल गोईकणे यांनी सांगितले की, “भारतीय रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी ब्रिटिशांनी इगतपुरीत रेल्वे रुग्णालय सुरू केले. १९९८ पर्यंत हे रुग्णालय टीबी वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, शवविच्छेदन कक्ष आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज होते. भुसावळ आणि झांशीसह अनेक ठिकाणांहून लोक येथे उपचारासाठी येत. पण आता हे रुग्णालय शेवटची घटका मोजत आहे. कर्मचारी आणि गंभीर रुग्णांना आता उपचारासाठी नाशिक किंवा कल्याण येथील रुग्णालयांमध्ये जावे लागते. हे रुग्णालय अपघातप्रवण भागात असल्याने रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी एक ते दीड तास म्हणजे ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचे असतात, पण सध्या हे रुग्णालय फक्त सर्दी तापासारख्या किरकोळ आजारांवर उपचार करते, असेही ते म्हणाले. यासंदर्भात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने वेळोवेळी आंदोलन केले आहे, पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने आयसीयू वॉर्ड्सची संख्या तातडीने वाढवली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.