
इगतपुरीनामा न्यूज – सार्वत्रिक निवडणुक झाल्यानंतर थेट सरपंचासह ४ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिल्याने चर्चेत आलेल्या कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज इगतपुरीत पार पडली. ह्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच पांडुरंग रामचंद्र खातळे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार विजयी झाले आहेत. थेट सरपंचपदी श्रावण पांडुरंग आघाण यांनी विजय मिळवला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून पंढरीनाथ रामचंद्र आघाण, आशाबाई पंढरीनाथ आघाण आणि चंद्रभागा राजाराम खातळे हे ३ जण निवडून आले. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पॅनलचे मार्गदर्शक राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच पांडुरंग रामचंद्र खातळे, निवृत्ती खातळे, लक्ष्मण खातळे, अशोक आघाण यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी जल्लोष करून विजय साजरा केला.