

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा, न्यूज, दि. ३
महत्वाचे : ह्या बातमीची कॉपी करून अन्य माध्यमात प्रसिद्ध केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मागील आठवड्यात आरक्षण काढण्यात आले. ह्यामुळे कुठे धुमारे अन कुठे फवारे असे वातावरण जिल्हाभर निर्माण झाले. विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुद्धा सुरु करून जनसंपर्क वाढवला. आरक्षणामुळे अनेक बड्या नेत्यांची राजकीय कोंडी होऊन 5 वर्षाचा विजनवास त्यांना भोगावा लागणार आहे. ह्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ह्या जिल्हा परिषद गटातील अनुसूचित जाती हे आरक्षण रद्दबातल झाले आहे. हे आरक्षण चुकीचे असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन असून याबाबत निर्णय घेण्यात आला. अंजनेरी गटातील अनुसूचित जातीचे आरक्षण बदलल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एका गटाला अनुसूचित जाती हे आरक्षण लागू करण्यात येणार आहे. संबंधित गटात अन्य जातीच्या प्रवर्गाचे आरक्षण असेल तर पुन्हा तिसऱ्या एखाद्या गटावर आरक्षण बदलण्याची परिस्थिती उद्भवणार आहे. अंजनेरीचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाच्या गटावर पडले तरच अन्य गटांवरील आरक्षण शाबूत राहणार आहे. दरम्यान यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व गटांच्या राजकारणाला कलाटणी मिळणार असून समीकरणे बदलणार असल्याचे निश्चित झाले आहे.


2007 मध्ये जिल्हा परिषदेच्या अंजेनेरी ह्या गटात अनुसूचित जातीचे आरक्षण पडले होते. तत्कालीन आरक्षणानुसार अंबापुरे नामक सदस्या निवडून आल्या होत्या. जिल्हा परिषद गटांचे आरक्षण काढतांना ही बाब विचारात घेतली नसल्याने अनुसूचित जाती हे चुकीचे आरक्षण पडल्याची हरकत जिल्हाधिकाऱ्यांकडे घेण्यात आली. ह्यावर सर्वांगीण पुरावे आणि उपलब्ध माहितीचा मागोवा घेण्यात आला. त्यानुसार अंजनेरी ह्या गटातील अनुसूचित जाती हे आरक्षण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आरक्षण बदल झाल्यावर अनुसूचित जाती हे आरक्षण जिल्ह्यातील अन्य एखाद्या गटावर लागू करण्यात येईल. त्या गटात सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण असले तर अन्य गटांवर परिणाम होणार नाही. मात्र तेथे अन्य जातीचे आरक्षण असेल तर मात्र ह्याचा परिणाम किमान 5 गटांना भोगावा लागणार आहे. याप्रकरणी प्रशासकीय यंत्रणा घेणार असलेल्या दुरगामी निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.

