इगतपुरीनामा न्यूज – ‘पोलीस सेवेत येण्यासाठी लाखो युवकांची धडपड चालू असते. ही भरती कस लावते. प्रतिभावंत आणि प्रामाणिक कष्ट घेणाऱ्या युवकांनाच यश मिळते. कधीकधी यश उशिरा मिळते. माणूस हतोत्सहित होतो आणि शॉर्टकट शोधू लागतो. हा शॉर्टकट कधीकधी लॉंगरूट ठरू शकतो. त्यामुळे मेहनतीशी प्रामाणिक राहा. भरती झालो की कष्ट संपले असे नसून सेवेत रुजू झाल्यानंतर खरी मेहनत सुरू होते. त्यामुळे निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त जरूर करावा परंतु गावकऱ्यांना अभिमान वाटेल असे कार्य हातून घडेल याबाबत जागृत राहावे असे प्रतिपादन लासलगांवचे पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड यांनी केले. गोंदेगाव येथील पोलीस झालेल्या आशा अरुण जगदाळे या तरुणीच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. गोंदेगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने शनिवारी सत्कार समारंभ आयोजित केला होता. माजी पंचायत समिती सभापती आणि शिवसेना निफाड तालुकाप्रमुख शिवा सुराशे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड म्हणाले की, आशाचे यश म्हणजे दुर्दम्य आशावादाचे उदाहरण आहे. मेहनत, तपस्या, निष्ठा, प्रामाणिक प्रयत्न यांची सांगड घालून पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त झालंय. गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहेच. शिवाय पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतींसाठी प्रेरणादायी आहे. पोलीस दलात गोंदेगावमधील महिलांचा वाटा विस्तृत आहे. तर मुलांची आकडेवारी निराशाजनक आहे. मुलांनी देखील मेहनतीने या सेवेत यावे, असे देखील ते म्हणाले. माजी पंचायत समिती सभापती शिवा सुराशे, सामाजिक कार्यकर्ते माधव जगताप, माजी सरपंच शांताराम कांगणे, शिक्षक धात्रक सर यांनी मार्गदर्शन केले. गोंदेगाव ग्रामपंचायत, सोसायटी, भजनी मंडळ आदी संस्थांनी आशा जगदाळे हिचा सत्कार केला. कार्यक्रमास सरपंच अनिल रणशूर, हरीष गवळी, योगेश भोसले, रज्जाक पठाण, प्रवीण नाईक, रावबा साळवे, दत्तू साळवे, तानाजी भोसले, व जगदाळे कुटुंबीय आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल देविदास लाड यांचे आणि शिवसेना निफाड तालुकाप्रमुख निवड झाल्याबद्दल शिवा सुराशे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मेथे पाटील यांनी केले.