
निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते भागात सलग दोन दिवस बिबट्याने हल्ले केल्यानंतरही तालुक्यात दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे बिबट्यांनी जणू इगतपुरी तालुकाच दत्तक घेतलाय की काय ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. बिबट्यांची संख्या अचानक वाढल्याने इगतपुरी तालुक्यातील विविध भागांत ऐन सणासुदीच्या काळात भयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपळगाव मोर येथे आजच साडेसात वाजता गातवे वस्तीवर बिबट्याचे दोनदा दर्शन झाले. ह्या बिबट्याने दुसऱ्यांदा वस्तीवरील कुत्र्याचा फडशा पाडला. ह्या भागात यापूर्वी बिबट्याने जीवघेणे हल्ले केलेले असल्याने नागरिक संकटात सापडले आहेत. इगतपुरी शहरातही बिबट्याने भीतीचे सावट वाढवले असल्याचे दिसते.
‘बिबट्यांनी जणू इगतपुरी तालुकाच दत्तक घेतलाय की काय?’ अशी चर्चा नागरिक करीत आहेत. भात कापणीच्या कामांना नुकतीच सुरुवात झाली असल्याने शेतावर काम करणाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पिंपळगाव मोर येथे हल्ल्यात बालिकेवर हल्ला केल्यानंतर २ बिबट्यांना वनविभागाने पकडले होते. यंदाही नागरिकांना बिबट्या दिसत होता. आज दोन-तीन वेळा दर्शन व कुत्र्यावर हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली असून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. वीज देयके न भरल्याने इगतपुरी तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे पथदीप व हायमास्टचे कनेक्शन कट केले असल्याने ग्रामपंचायती अंधारात आहेत. त्यातच तालुक्यात रोजच बिबट्यांचे दर्शन होत आहे. शासनाने तातडीने सुवर्णमध्य काढून निर्णय घेऊन ग्रामपंचायतीना दिलासा द्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.