
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी सायंकाळच्या सुमारास साकुर, साकुर फाटा, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, तातळेवाडी, धामणगाव, अडसरे, भरवीर, भंडारदरावाडी, टाकेद परिसरात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात जोरदार गारपीट झाली. जोरदार वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, काकडी, वांगी, मिरची, दोडकी, कलिंगड आदींसह सर्व बागायत पिके व रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, मका, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वादळामुळे अडसरे खुर्द, भंडारदरावाडी यांसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे घराचे छत उडून पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. यात जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीची प्रशासनाने प्रत्यक्षात पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी.
यासोबतच धामणगाव, टाकेद परिसरातील अनेक वीट भट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वीट भट्टी व्यवसायिक पूर्णतः डबघाईला आला आहे. अडसरे खुर्द येथील वरसुआई परिसरात शेतावर राहत असलेले शेतकरी बाळू लक्ष्मण साबळे व भंडारदरावाडी भरवीर येथील शेतकरी दगडू सखाराम साबळे यांच्या राहत्या घरांचे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या घरांचे पत्र्याचे छत पूर्णतः उडून जाऊन घरांतील जीवनावश्यक सामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या नुकसानीचे स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांना आदेश करून घटनास्थळी पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, प्रताप जाखेरे, राम शिदे, अशोक गाढवे, सागर गाढवे, विलास भगत, राज जावरे, निलेश जोशी, राजू राखेचा, सत्यम काळे, दिलीप लहाने आदी उपस्थित होते.
