९ वर्षाच्या चिमुकल्या गिर्यारोहकाची कमाल : एकाच वेळी ३ खडतर किल्ले केले सर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – सह्याद्रीची पर्वतरांगेतील अनेक गड किल्ल्याना शिवकालीन वारसा असून यातील अलंग, मदन आणि कुलंग किल्ले अत्यंत खडतर समजले जातात. धाडसी गिर्यारोहकही या किल्ल्यापुढे नतमस्तक होऊन टप्प्याटप्प्याने हे तिन्ही किल्ले सर करतात. मात्र घोटीतील एका धाडसी आणि जिद्दी चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या साथीने एकाच वेळी हे तिन्ही किल्ले सर करून इगतपुरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. घोटीतील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. भूषण धांडे यांच्या ९ वर्षाच्या विहान या मुलाला बालपणापासूनच ट्रेकिंगचा छंद आहे. वडीलांनाही हा छंद असल्याने हा छंद विहान यानेही जोपासला. वडीलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विहान याने लहान पणापासूनच लहान व सोपे गडकिल्ले सर केले. मात्र शिवकालीन वारसा लाभलेल्या अलंग, मदन आणि कुलंग या तिन्ही किल्ले एकाच वेळी सर करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला होता. मात्र हे तिन्ही किल्ले खडतर व अवघड असल्याने आरंभीच्या काळात वडीलांनी नकार दिला. मात्र विहान हा जिद्दीवर पेटल्याने अखेर हे किल्ले पादाक्रांत करण्याचे निश्चित झाले. आग ओकणारा सूर्य, अरुंद पाऊलवाट, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, जागोजागी पायऱ्या नसल्याने रॉक क्लाइम्बिंग करून चढाई अशी खडतर कसरत करीत विहान यांने आपले वडील डॉ. भूषण धांडे यांच्या साथीने सलगपणे तिन्ही किल्ले यशस्वीपणे सर केले. विहान याला या मोहिमेत डॉ. भूषण धांडे, कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, घाटघर येथील एकनाथ खडके आदींचे मार्गदर्शन लाभले. विहान याच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!