
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – पुढील काही महिने पाणी पुरणार नाही. भीषण पाणी टंचाई येईल असे कारण सांगत इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे ग्रामपंचायतीपैकी खैरेवाडी येथील विहीरीवरील सौरऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. वीज पुरवठा मिळत नसल्याने ही नळपाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर सुरू करण्यात आलेली होती. मात्र नळपाणी पुरवठा सुरू राहीला तर पाणी टंचाई निर्माण होईल असे कारण देत आज हा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. येथील आदिवासी महिलांना सांगण्यात आले की,तुम्ही डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणा. यामुळे एल्गार कष्टकरी संघटना आक्रमक झाली आहे. उद्या बुधवारी इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज कनेक्शन कट करून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणा असे पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका स्वयंसेवी संस्थेने ७५ वर्षात पहिल्यांदा ह्या विहिरीवर सौरऊर्जा पंप बसून या वाडीला पाणी दिले. या ठिकाणी पाणी मिळावे म्हणून या वाडीतील ग्रामस्थांनी शेकडो वेळा आंदोलने केली आहेत. जेंव्हा भीषण पाणीटंचाई असते तेव्हा ह्या वाडीवर जायला कुठल्याही अधिकारी ग्रामसेवकांना वेळ मिळत नाही. मात्र आज शासकीय सुट्टी असतानाही ह्या नळ पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन कट करण्यासाठी मात्र पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व ग्रामसेवक त्या वाडीत पोहोचले. ह्याचा मी निषेध करतो असे एल्गारचे संस्थापक भगवान मधे यांनी सांगितले.
