नवा उड्डाणपुल वाहतुक कोंडीसाठी मैलाचा दगड ठरेल : खासदार हेमंत गोडसे यांचे प्रतिपादन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

नाशिक शहराच्या मध्य भागातून मुंबई-आग्रा महामार्ग जात असल्यामुळे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. मात्र शहराच्या आडगाव गावाकडे जाणाऱ्या बाहेरील बाजुस अजुनही काही प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी के. के. वाघ ते हॉटेल जत्रा या दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून हा उड्डाणपुल वाहतूक सुरळीत करण्यासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

शहरातून जाणाऱ्या मुंबई–नाका, द्वारका, आडगाव नाका, औरंगाबाद नाका, के. के. वाघ महाविद्यालय, अमृतधाम, बळी महाराज मंदीर, हॉटेल जत्रा या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे आज रविवारी ( दि. ८) खासदार गोडसे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा कार्यक्रम आडगाव शिवारातील अंबिका टेक्सस्टाईल समोरील उड्डाणपुलाच्या सुरवातीच्या ठिकाणी पार पडला. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, दत्ता गायकवाड, प्रभाग सभापती प्रशांत दिवे, उद्धव निमसे, नगरसेवक आर. डी. धोंगडे, केशव पोरजे, सूर्यंकात लवटे, उत्तम कोठळे, रमेश गायकर, दिलीप मोरे, सुनील जाधव, राहुल दराडे, विशाल कदम, अमोल सूर्यवंशी, नाना काळे, हरीभाऊ काळे, विश्वास तांबे, रुपेश पालकर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, मल्हारी मते, बालाजी माळोदे, पोपट शिंदे, महेश मते, गोकुळ मते, निलेश मोरे, प्रभाकर माळोदे, दस्तगीर रंगरेज, लक्ष्मी ताठे, शैलेश सूर्यवंशी, ज्योती देवरे, सचिन परदेशी यांच्यासह अग्रवाल कंपनीचे प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा तसेच सतत होणाऱ्या अपघातांना आळा बसावा, महामार्गावरील वाहतूक वेगाने तसेच विनाअडथळा व्हावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या पुलाच्या कामासाठी केंद्राने साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे या उड्डाणपुलाची उभारणी नुकतीच पूर्ण झाली. आज सकाळी खा. गोडसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फित कापून उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतुकीसाठी उड्डाणपुल खुला केल्यामुळे शहरवासियांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या वाढत्या विस्तारासह वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत होती. यामुळे शहरातील द्वारका चौक, काठेगल्ली सिग्नल, आडगाव नाका, निमाणी, पंचवटी, औरंगाबाद नाका, अमृतधाम, जत्रा हाटेल, राजबिहारी रोड, लिंक रोड आदी भागात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत होत्या. आता उड्डाणपुल वाहतुकीस खुला झाल्यामुळे शहर आणि शहरालगतचा परिसर वाहतूक कोंडीमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी याप्रसंगी सांगितले. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल या दरम्यानाचा उड्डाणपुलामुळे पंचवटी, आडगाव परिसरातील मुबंई-आग्रा महामार्गावरील वाहतूक सतत सुरळीत राहण्यासाठी निश्चितच मोठी मदत होणार असून हा पुल वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय ठरणार असल्याचा विश्वास खा. गोडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!