इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – २००५ पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु केलेली नाही. त्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून त्यांना फक्त अडीच हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तो पर्यंत संप आणि संघर्ष असाच सुरूच राहणार आहे असे प्रतिपादन सीटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड यांनी केले. ते इगतपुरी नगरपरिषद कार्यालयाबाहेर बसलेल्या आंदोलनात सहभागी झाले तेव्हा बोलत होते. कामगार कर्मचारी व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासुन विविध मागण्यासह जुनी पेन्शन योजना लागु व्हावी यासाठी राज्यव्यापी कर्मचारी आंदोलनात सहभागी होत महाराष्ट्र नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने मइगतपुरी नगरपरिषद कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
कर्मचारी घरकुल योजना, आरोग्य योजना यासह नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा मासिक पगार महिन्याच्या १ तारखेला मिळावा, जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागण्याबाबत शासनाने वेळोवेळी कामगारांची दिशाभुल केल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात सीटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड, राज्य सचिव कॉ. देविदास आडोळे, तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, मोहन जाधव, गौतम कोंगळे, नगरपरिषद संघटना उपाध्यक्ष सदानंद शेळके, शाखा सचिव कृष्णा गायकवाड, उपाध्यक्ष विनोद जिनवाल, सेक्रेटरी मनोज चरण, संघटक राजकूमार बैद, प्रमीला चरण, दिपक साळवे, रेखा निकाळे, प्रीती जिनवाल आदी उपस्थित होते.