आदिवासी ठाकूर समाजातून गुणवंतांची फौज निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांचे सरपंचांना मार्गदर्शन

लोकनियुक्त सरपंचांच्या वतीने स्वागत आणि सत्कार समारंभ संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

महाराष्ट्रात मागासलेल्या आदिवासी ठाकूर समाजाची विविधांगी उन्नती झाली तर देशविकासात भर पडेल. समाजात शिक्षणाची गंगा वाहत राहिल्यास समृद्ध ठाकूर समाज सर्वांपुढे आदर्श ठरू शकेल. अडचणी आणि समस्या यांचा बाऊ न करता आदिवासी ठाकूर समाजाने प्रगतीपथावर जाण्यासाठी विधायक मार्गाचे अनुसरण करावे. आगामी काळात ठाकूर समाजात गुणवंतांची फौज निर्माण करण्यासाठी सर्वांनी अग्रेसर असावे. यासाठी माझ्याकडून आवश्यक ते सर्व साहाय्य करील असे प्रतिपादन इगतपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजातील विविध लोकनियुक्त सरपंचांतर्फे त्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. पथवे बोलत होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पथवे पुढे म्हणाले की, इगतपुरी तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजातील लोकनियुक्त सरपंचांची जबाबदारी मोठी आहे. लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून ग्रामविकासाला प्राधान्य द्यावे. कुठल्याही परिस्थितीत कोणाचेही शिक्षण थांबू नये यासाठी दक्षता घ्यावी. सर्वच सरपंचांचे कार्य चांगले असल्याने जनतेमुळे मिळालेल्या संधीचे सोने करावे. आदिवासी ठाकूर समाजाची मान अभिमानाने उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असावे असेही ते शेवटी म्हणाले.

खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण, त्रिंगलवाडीचे सरपंच अशोक पिंगळे यांनी ह्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी देवळेचे सरपंच ज्ञानेश्वर उघडे, चिंचलेखैरे सरपंच मंगाजी खडके, बोर्लीचे सरपंच हिरामण झुगरे, कुरुंगवाडीचे माजी सरपंच शंकर सावंत, आवळखेडचे सरपंच कृष्णा केवारी, रायांबेचे सरपंच शिवाजी पिंगळे, बोर्लीचे उपसरपंच गोविंद भले, शेवगेडांगचे सरपंच साहेबराव खंडवी, धार्णोलीचे सरपंच रमेश पथवे, शेणवड बुद्रुकचे सरपंच जयराम खडके, कांचनगावचे सरपंच बाळू भगत, सामाजिक कार्यकर्ते दशरथ बुंदेले, चिंचलेखैरेचे माजी सरपंच निवृत्ती खोडके, सामाजिक कार्यकर्ते मंगळू मोंडूळे, पिंपळगाव भटाटाचे सरपंच बळवंत हिंदोळे, धारगावचे सरपंच निवृत्ती पादिर, ओंडलीचे सरपंच प्रकाश खडके आदी उपस्थित होते.

शासकीय अधिकारी एका विशिष्ठ समाजाचे नसतात. तरीही आदिवासी ठाकूर समाजातून खडतर मार्गाने अव्वल पोलीस अधिकारी झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा फायदा आमच्या उपेक्षित आदिवासी ठाकूर समाजाला व्हावा यासाठी आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांचे स्वागत आणि सत्कार करतांना आमच्या सर्व सरपंचांना आत्यंतिक समाधान लाभले.

- ॲड. मारुती आघाण, सरपंच खैरगाव तथा आयोजक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!