स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याची गुरुकिल्ली

ज अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धा परीक्षांची जय्यत तयारी करतात. या परीक्षांमध्ये पहिल्या प्रयत्नात चांगले यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे ? हे सांगणारा मार्गदर्शक लेख

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३

स्पर्धा परीक्षांची तयारी
आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढू लागला आहे. पूर्वीपेक्षा आता मार्गदर्शनाची सोय, मुबलक अभ्यास साहित्य उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती वाढत आहे. UPSC, MPSC, RRB, SSC, IBPS, TET, PET, NET, SET, JRF तसेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या CET परीक्षेची तयारी महाविद्यालयीन आणि अभ्यासक्रमाची तयारी करीत असतानाच विद्यार्थी करीत आहेत. ही गोष्ट निश्चितच महाराष्ट्रातील युवकांच्या दृष्टीने महत्वाची आणि उत्साह निर्माण करणारी आहे. यात पहिल्या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे महत्वाचे आहे.

ध्येय निश्चित करा
सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे ध्येय निश्चित करा. आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे ? हे एकदा ठरविले की त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. त्याची माहिती चांगल्या प्रकारे करून घेणे गरजेचे असते.

स्वतःची क्षमता तपासा
बरेच विद्यार्थी इतरांचे अनुकरण करतात. मित्राने इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचे ठरविल्याने आपणही या शाखेला प्रवेश घ्यावा असे वाटते. असे असेल तर याची आवड, हा अभ्यासक्रम आपल्याला पेलवेल का ? यातील अवघड असणारे जे काही विषय आहेत, त्याला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकू का ? याचा प्रत्येक टप्प्यावर विचार केला पाहिजे. अन्यथा मित्राचे अनुकरण करताना मोठी चूक होण्याची शक्यता असते. म्हणून स्वतःच्या क्षमतेचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
कोणत्याही परीक्षेसाठी, स्पर्धेसाठी, यशस्वी होण्यासाठी, चांगल्या वाटचालीसाठी सकारात्मक असणे आवश्यक असते. खरे तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. तसेच कोणतीही परीक्षा अवघड नसते हे लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीची, एखाद्या विषयाची किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेची उगाचच आपण भीती, धास्ती घेतलेली असते किंवा आपल्या मनात तशा प्रकारची परिस्थिती कोणीतरी निर्माण केलेली असते. त्यामुळे आपली मानसिकताही तशी तयार होते. ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील कितीतरी विद्यार्थ्यांनी कष्ट घेऊन यश मिळविलेले आहे. हे आपण सतत वाचत असतो. यासाठी अवघड काहीच नाही हे मनाशी पक्के ठरवा.

यशस्वी विद्यार्थ्यांचा आदर्श
स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविलेले आहे त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखती वाचा. त्यांच्याशी चर्चा करा. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला निश्चित होईल.

कष्टाची तयारी ठेवा
स्पर्धा परीक्षांमध्ये पहिल्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी कष्ट हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आज अभ्यास म्हटला की अनेक विद्यार्थ्यांना कंटाळा येतो. वाचन लेखन म्हटले की विद्यार्थ्यांना ते नको असते. यश मिळवायचे असेल तर कष्ट करावेच लागतील. विद्यार्थ्यांनी या कष्टाला अजिबात घाबरण्याचे कारण नाही. कारण अभ्यास म्हणजे काय करायचे आहे ? वाचन, लेखन, मनन, चिंतन, आकलन, पाठांतर आणि या गोष्टी का कष्टाच्या आहेत ? उलट अभ्यासाने, वाचनाने मनुष्य समृध्द, संपन्न आणि श्रीमंत होतो हे विसरता कामा नये. उज्ज्वल भविष्यासाठी थोडे कष्ट तर घ्यावेच लागतील.

चांगले अभ्यास साहित्य
स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी चांगल्या अभ्यास साहित्याची निवड केली पाहिजे. म्हणजे आपला वेळ आणि मेहनत वाया जात नाही. आज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणात अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थ्यांना हे माहीत नाही. म्हणून सर्वात प्रथम तुम्ही जी स्पर्धा परीक्षा देणार आहात त्यासाठी जे अभ्यास साहित्य निवडणार आहात ते चांगले, दर्जेदार असले पाहिजे. मराठीत अभ्यास साहित्य कमी आहे असे वाटत असेल तर हिंदी आणि इंग्रजीतही आज मोठ्या प्रमाणात अभ्यास साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्याचीही मदत आपण घेऊ शकतो. इंग्रजी अवघड वाटत असेल तर हिंदी भाषेची निवड करावी. त्यातील काही अवघड वाटले तर त्याचा अर्थ शोधण्यासाठी शब्दकोशाची मदत घ्यावी.

अडथळे दूर करा
कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यात अडथळे हे असणारच. म्हणून ती गोष्ट करायचीच नाही का ? अभ्यास साहित्य, अभ्यासाचे ठिकाण, अभ्यासात लक्ष न लागणे, एखादा विषय अवघड वाटणे, पाठ करण्याचा कंटाळा असे अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. परंतु अशा अडथळ्यांवर यशस्वीपणे मात करणे गरजेचे आहे. तरच चांगल्या प्रकारे आपल्याला यश मिळविता येईल.

माहितीचे संदर्भ स्त्रोत
स्पर्धा परीक्षा म्हटली की अनेक गोष्टींची माहिती आपल्याला लागेल. ही माहिती कोठे मिळेल ? सहजरीत्या कशी मिळेल ? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आजचे युगच हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात माहिती मिळविण्याची अनेक आधुनिक साधने आलेली आहेत. विद्यार्थ्यांनी त्यासाठी या साधनांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यावा. संकेतस्थळे आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने विकिपिडियावरुन त्याच्या विषयाची आठशे पाने मिळविली. त्यामुळे त्या अभ्यास साहित्याचा परीक्षेत त्याला चांगला उपयोग झाला.

माहितीची पारंपरिक साधने
माहिती मिळविण्याची जशी आज आधुनिक साधने मोठ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे माहिती मिळविण्याची पारंपरिक साधनेही आहेत. विद्यार्थ्याने यासाठी आपल्या परिसरातील एखाद्या चांगल्या ग्रंथालयाचा अवश्य उपयोग करावा. ग्रंथालयात ज्ञानकोश, विश्वकोश, भारतीय संस्कृतीकोश, समाजविज्ञानकोश, पर्यावरणशास्त्रकोश, संरक्षणशास्त्रातील संकल्पनाचा कोश इत्यादी कोश वाङ्मय मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व महत्त्वाचे अभ्यास साहित्य आहे. माहिती मिळविण्याची ही साधने आहेत. याबरोबरच विविध विषयांवरील मासिके चाळा. वर्तमानपत्रांचे वाचन करा. थोडक्यात म्हणजे वाचन वाढवा म्हणजे तुमचा ज्ञानाचा साठा समृध्द होईल.

इतर महत्वाच्या गोष्टी
कोणत्याही परीक्षेत पहिल्या प्रयत्नात चांगले यश मिळविता येते. त्यात अवघड असे काहीच नाही. अभ्यासातील सातत्य, अभ्यासक्रम माहित करुन घेणे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून घेणे, परीक्षेतील सर्व टप्प्यांची चांगल्या प्रकारे माहिती असणे,  अभ्यास साहित्यातील विविधता, स्वत : काही प्रश्न तयार करणे या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. कोणतीही परीक्षा अवघड नाही हे एकदा लक्षात घेतले की पहिल्या प्रयत्नात चांगल्या प्रकारचे यश मिळविता येते हे लक्षात ठेवा.


( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी प्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

5 Comments

 1. avatar
  शशिकांत भगवान तोकडे says:

  खूप छान सर. प्रत्येकाने वाचावे आणि त्यानुसार अभ्यास करावा अशी महत्वाची माहिती आहे,

 2. avatar
  विलास जोपळे says:

  या लेखातून ”स्पर्धा परीक्षा” काय असते…? हे खूप योग्य रीतीने समजते…आणि.. ध्येय निश्चित ..कसे करावे..किंवा योग्य परीक्षा..आपले क्षेत्र निवड .. आवड असलेले करियर क्षेत्र …कसे निवडावे..तयारी करताना ..घ्यावयाची काळजी… वाया जाणारा वेळ..वा भरकटणारे मार्ग ..खूप योग्य समजतात…

 3. avatar
  प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

  स्पर्धा परीक्षा स्वरूप, मार्गदर्शन, यशस्वी होण्याचा मार्ग या लेखातून मोलाची व महत्वपूर्ण माहिती सर्वाना मिळाली. सर आपल्या मार्गदर्शना खाली अनेक विद्यार्थी यशस्वी झाले व होणार आहे.

 4. avatar
  गजानन होडे says:

  सर, अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. स्पर्धापरीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना दिशादर्शक असा हा लेख आहे. स्पर्धापरीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची सविस्तर माहिती दिली आहे. सर आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार. आपले मार्गदर्शन सदैव प्रेरणादायक असते आणि आहे.

 5. avatar
  अशोक रा.भालेराव says:

  प्रा. देविदास गिरी सर, प्रा. छाया मॅडम यांनी नाशिक मध्ये नेट/सेट परीक्षांसाठी मोठी मेहनत घेतलीय. गेल्या 28-29 वर्षात अनेकांना परफेक्ट मार्गदर्शन करून प्राध्यापक होण्यासाठी विशेष क्लास घेऊन त्यांना घडविले. महाराष्ट्रात पहिली सेट…… सन 1992-93 माधव सुरु झाली. याचा मी तेंव्हापासूनचा साक्षीदार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!