आंबोली येथे जागतिक आदिवासी गौरव दिन सोशल नेटवर्किंग फोरमच्या वक्तृत्व स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रमाने केला साजरा

ज्ञानेश्वर मेढे पाटील, इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे आदिवासी दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा तसेच गुणवंत दहावी व बारावी विद्यार्थी यांचा सन्मान करून वृक्षारोपण करण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांच्या विद्यमाने तसेच डॉ. नितु मांडके व आदिती बक्षी यांच्या योगदानाने,ग्राम समन्वयक ज्ञानेश्वर मेढेपाटील यांच्या नियोजनाने आज जागतिक आदिवासी गौरव दिन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोशल नेटवर्कींग फोरम ही सोशल मिडीयाचा आधार घेऊन सुरु झालेली चळवळ गत 11 वर्षापासून नाशिक जिल्हयाच्या विशेष करून पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यात पाणी, आरोग्य, व शिक्षण या मूलभूत गरजांवर काम करणारी संस्था आहे. यामध्ये वर्षानुवर्ष टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करतांना जवळपास 25 गावांचा पाणीप्रश्न सोडवला आहे. भविष्यातही अनेक गावांसाठी पाणी योजना राबवण्याचे काम सुरू आहे.आदिवासी व ग्रामीण दुर्गम भागातील बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यात कुपोषण निर्मूलनाचा मोठा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. सध्या पेठ तालुक्यातील 700 कुपोषित बालकांना एक महिन्याचा पुरक पोषण आहार उपलब्ध करून दिला असून गावोगाव त्याची कार्यवाही सुरू आहे. अति तीव्र कुपोषित बालकांना नाशिक येथील नामांकित डॉक्टरांमार्फत उपचार करण्यातही संस्थेचा मोठा पुढाकार आहे.

शिक्षण ही काळाजी गरज आहे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन सोशल नेटवर्कींग फोरमने ग्रामीण व दुर्गम भागातील वाडी वस्तीवरील मुलांबरोबर स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवकांना शैक्षणिक बळ दिले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य, डिजिटल शाळा, संगणक प्रयोगशाळा, सार्वजनिक वाचनालय या सोबत पेठ व शेवखंडी येथे MPSC / UPSC च्या युवकांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका सुरू केली आहे. भविष्य काळात गाव तेथे वाचनालय ही संकल्पना पुर्ण करण्याचे संस्थेचे कार्य चालू आहे.

जागतिक आदिवासी दिन साजरा करतांना ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ मिळावे यासाठी सोशल नेटवर्कींग फोरमच्या माध्यमातून पेठ, त्र्यंबक व दिंडोरी तालुक्यातील 12 गावांना अशाच प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र प्रदान करून समारंभपूर्वक गौरवण्यात येत आहे. सोशल नेटवर्कींग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड, समन्वयक ज्ञानेश्वर मेढेपाटील यांचे सहकार्यातून आज स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, क्रांतिकारक बिरसा मुंडा,क्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावर विद्यार्थी भाषणे करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद शाळा अंबोली तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी अध्यक्षस्थानी कवी, साहित्यिक देवचंद पाटील महाले लाभले. त्यांनी आपल्या भाषणात खरा आदिवासी कसा याचे जीवन चरित्र तसेच निसर्गाविषयी माहिती दिली. निसर्गातून काय शिकले पाहिजे, कसे पाहिले पाहिजे तसेच जो निसर्गाचा खऱ्या अर्थाने अभ्यास करेल त्याला सर्व काही अनुभवायला मिळेल. निसर्गामध्ये सर्व काही दडलंय प्रत्येकाने एक वृक्ष लावून निसर्ग जिवंत ठेवला पाहिजे तरच सर्व मानव जात जिवंत राहू शकते याचे महत्व सांगून यातून पटवून दिले. आज निसर्ग आहे तर मनुष्य आहे हे मान्य करून निसर्गाचा सांभाळ केला गेला पाहिजे, असे अनमोल शिकवण त्यांनी येथील उपस्थिताना दिली. प्रमुख पाहुणे म्हणून इनर व्हिल क्लबच्या संच्यालिका रुपल गुजराथी यांनी उपस्थिती लावून आपल्या इनर व्हील क्लबच्या वतीने सोशल नेटवर्किंग फोरमच्या टीमचे कौतुक केले. आपणही आपल्या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरिबासाठी आदिवासी मागास वर्गासाठी आम्ही भविष्यात विशेष काम करण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करू असे त्यांनी आवर्जून बोलून दाखवले

यावेळी सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने विद्यार्थी यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, एकूण चौदा विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक पल्लवी सोमनाथ मेंगाळ, राधिका गोकुळ मेढे, गौरी योगेश मेढे, उत्तेजनार्थ क्रमांक रोहिणी मनोहर गुंबाडे यांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. इतर सहभागी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी येथील दहावी व बारावी वर्गात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीना रोख रक्कम, भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आंबोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांचा सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व कार्यक्रम कॉ नाना मालुसरे येथील मुख्याध्यापक गावीत सर व त्यांचे शिक्षक कर्मचारी यांचे विशेष योगदान व सहकार्य लाभले. यावेळी विशेष सहकार्य म्हणून आंबोली युवा मंचच्या वतीने आभार प्रदर्शन योगेश मेढे यांनी केले.
डॉ. भोई, डॉ. घोरपडे,पोलीस पाटील तथा सोशल नेटवर्किंग फोरचे आंबोली ग्रामसमन्वयक ज्ञानेश्वर मेढे पाटील, युवा मंचचे सदस्य योगेश मेढे, माजी सरपंच पांडुरंग लचके, वनविभाग अधिकारी गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, मुख्याध्यापक हिरामण गावीत सर,प्रवीण भामरे, अनिल भामरे, गोविंद राऊतमाळे, संतोष जगताप, धर्मराज गायकवाड, इनरव्हील क्लबच्या रुपल गुजराथी व त्यांच्या सहकारी, ग्रामस्थ कारभारी मेढे, डॉ. पवार, आरोग्य कर्मचारी दीपक मिंदे आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!