कोरोना योद्धा शिक्षकांना विमा संरक्षण देण्याची शिक्षक भारतीची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. १८ : कोरोना विरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरू आहे. त्यासाठी कोरोना विरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यामध्ये कोरोना विरूद्ध राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर सक्रिय सेवा देत आहेत. या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी शिक्षक भारतीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधक उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा संरक्षणाचा निर्णय शासनाने घेतला असून शासन निर्णयानुसार,कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेल्या जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता,घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य कर्मचारी, रोजंदारी, कंत्राटी, मानसेवी असे सर्व कर्मचारी अशा सर्व घटकांना ५० लाख रुपयांचा विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र यात शिक्षकांचा समावेश नाही. या कार्यामध्ये राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात, गावातील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, कन्टेनमेंट झोनमधील गावातील चेक पोस्टचे काम, प्रमुख रस्त्यावर पोस्टचे काम, लसीकरण केंद्रावर नोंदीची कामे, रेशन दुकानावर रेशन वाटप करणे, वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विविध संकलन करणे, जनजागृतीचे काम, गृहविलगीकरण रुग्णांची दैनंदिन अहवाल घेणे आदी अनेक कामांसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे कर्तव्य पार पडताना काही शिक्षक बांधवांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब पोरके झाले असून, त्यांचा आधार हरवल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.
तरी कोरोना विरुद्ध काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनाही ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे शिक्षक भरतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य सरचिटणीस भरत शेलार यांनी केल्याची माहिती शिक्षक भारतीचे नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र दिघे, राजेंद्र लोंढे यांनी दिली आहे.

Similar Posts

Comments

  1. avatar
    माधुरी पाटील says:

    योग्य वेळी योग्य मागणी केली आदरणीय श्री.कपिल पाटील साहेबांनी..👍👍👍

Leave a Reply

error: Content is protected !!