देवा, माणसांवर का रुसला ?


कवी : प्रकाश पाटील कवठेकर, इगतपुरी

“असं कसं देवा तू,
माणसांवर रुसला !
अर्ध्या वाटेत सोडून
म्हणतो आपला करार कसला ? !!

गाभाऱ्यातून बाहेर ये
तुला आम्ही हिशोब देतो !
किती वर्षाचे आयुष्य दिले
तुला आठवण करून देतो !!

व्याज नको देऊ
मुद्दल तरी जगू दे !
चाळीस वर्षे ठरलं होतं
माणूस म्हणून जगू दे !!

घोड्याचं आयुष्य तू
माणसांना व्याजात दिलं !
कसं सांगू तुला ते
किती धावपळीत गेलं !!

आता नाही तुला
जगण्यासाठी साकडं घालायचं !
उंटाचं आयुष्य परत घे
आम्हाला कुबड काढून नाही चालायचं !!

लोभापायी करून बसलो
आयुष्य मागून पाप !
माकडा परि बघत बसलो
नभाकडे टकमक टकमक !!

आयुष्याचा करार आपला
अजून संपला नाही !
व्हायरस पाठवून वसुली करणे
हे तुला शोभत नाही !!

पाहवत नाही डोळ्यांना या
दुःख हृदयी भरतो !
दार उघड गाभाऱ्याचे
तुझे चरण स्पर्श करतो !!

स्वार्थासाठी जगला माणूस
रूप तुझे आता कळू दे !
माणसाला माणुसकीने
जगण्याची संधी आता मिळू दे !!

( कवी प्रकाश पाटील कवठेकर राष्ट्रीय पातळीवरील नामवंत चित्रकार असून इगतपुरी पंचायत समिती अंतर्गत कोरपगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. )

Similar Posts

5 Comments

  1. avatar
    Shinde M D says:

    सत्य परिस्थिती कथन……..
    प्रकाशजी, खूप छान कविता केली.

  2. avatar
    उज्जेवाड एन.एल says:

    भाऊ खुपच भारी लिहतोस कविता

Leave a Reply

error: Content is protected !!