
इगतपुरीनामा न्यूज – ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. उद्या प्रजासत्ताकदिनी सुरेश मनोरे यांना सन्मानपूर्वक पदक देऊन गौरव होणार आहे. विशेष पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी यापूर्वी घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून देत कायद्याचे राज्य स्थापित केले आहे. गिरड ता. भडगाव येथील ते भूमिपुत्र असून घोटी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना त्यांनी जादू टोण्यातील खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. उत्तम तपासकार्यामुळे त्यातील दहा आरोपीना जन्मठेपेची जन्मठेप झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या महाराष्ट्र पोलीस दलातील ३४ वर्ष सेवेत नाशिक शहर, नागपूर शहर, नाशिक ग्रामीण व ठाणे ग्रामीण आदी ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणत कायदा सुव्यवस्था सतर्कतेने हाताळला आहे. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून सूक्ष्म पद्धतीने पारदर्शक काम करीत असल्याने त्यांना महत्वपूर्ण विशेष राष्ट्रपती पदक जाहीर झाले. महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इगतपुरीसह, पाचोरा येथून त्यांचे अभिनंदन होत आहे.