धामणी विद्यालयाच्या उपकरणाची राज्य विज्ञान प्रदर्शन आणि राज्य स्तरावरील इन्स्पायर अवार्डसाठी निवड

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात नवनवीन उपकरणे विकसित होत आहेत. शालेय पातळीवर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी बुद्धीला चालना देऊन नवनवीन उपकरणे बनवतात. दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करून वेळेची व आर्थिक बचत करणारे उपकरण तयार करतात. उपकरण वापरल्याने होणारे फायदे कसे होतात हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत असतात. धामणी येथील श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अर्जुन गायकवाड ह्याने असेच एक उपकरण बनवले आहे. उपकरणांचे नाव ‘अ डिव्हाईस फॉर सेफ ट्रॅव्हल आफ्टर पंचर’ असून गाडी पंचर झाल्यानंतर दुकानापर्यंत ढकलत नेऊन लागणारे शारीरिक कष्ट वाचवण्यासाठी हे उपकरण तयार केले आहे. मॉडेलसाठी मार्गदर्शक म्हणून आर. बी. गुजर, एस. ई. परदेशी, ए. एस. शिंदे आदींचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील रस्त्यांचे दुखणे काही नवीन नाही, त्यातच खेड्यावर शेतावर जाण्यासाठी शेतकरी दुचाकी वापरतात. अडगळीच्या ठिकाणी अथवा सोय नसलेल्या ठिकाणी दुचाकी पंचर झाल्यास ढकलत नेल्याशिवाय पर्याय नसतो. अधिक अंतर पंचर स्थितीत गेल्यास ट्यूब व टायर खराब होण्याचा देखील संभव असतो. यासाठी ह्या उपकरणाचा उपयोग होणार आहे.

नेमके काय आहे उपकरण ? – विद्यार्थ्याने बनवलेले उपकरण गाडीच्या चाकाच्या ठिकाणी बसवण्यासाठीची जागा आहे. चाक पंचर झाल्यास उपकरणातील चाके खाली घेऊन पंचर झालेले चाके सहजच वरती घेता येते. चाक वरती घेतल्यास गाडी ढकलण्यास कोणताही त्रास होत नाही व पंचरच्या दुकानापर्यंत आरामात जाता येते शिवाय ट्यूब-टायर खराब होण्यापासून वाचतो. ह्या उपकरणाची नाशिक जिल्ह्यातून राज्य स्तरावर निवड झाल्याने सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक आर. बी. गुजर, एस. पी. काळे, एम. एल. पवार, एस. ए. गुजर, जी. पी. जाधव, बी. एस. टोपे, पी. एन. गोरडे, एस. ई. परदेशी, डी. डी. भोसले, ए. एस. शिंदे, लिपिक व्ही. बी. बऱ्हे, व्ही. व्ही. घोटेकर, ए. बी. मूटकुळे, एस. जी. लाड, व्ही. एम.वाकचौरे व शालेय व्यवस्थापन समिती आदींनी स्वागत केले.

Similar Posts

error: Content is protected !!