संदीप ओंबासे यांची आशियाई तायक्वांदो युनियन संघटनेच्या वित्त आयोग समितीच्या सदस्यपदी नियुक्ती : इगतपुरीच्या आयडियल तायक्वांदो अकॅडमीतर्फे निवडीचे स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव संदीप यशवंतराव ओंबासे यांची आशियाई तायक्वांदो युनियन संघटनेच्या वित्त (फायनान्स) आयोग समिती सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नाशिक येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेच्या दरम्यान इंडिया तायक्वांदो अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आणि इंडिया – कोरिया जागतिक तायक्वांदोचे समन्वयक किराश बेहेरा यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे त्यांचीच आयडियल तायक्वांदो अकॅडमी ही शाखा चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, राज्य स्तरावर उत्तम कामगिरी केलेली आहे. इगतपुरी अकॅडमीने त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. आशियाई तायक्वांदो युनियनच्या विकासासाठी विविध उपक्रम अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या तायक्वांदो खेळाच्या सुविधा आणि व्यवस्था यांचे आर्थिक नियोजन आणि आयोजन सुव्यवस्थित होण्यासाठी संदीप ओंबासे यांनी तायक्वांदो या खेळासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली. त्यानुसार त्यांची निवड केल्याचे आशियाई तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष प्रो. क्यू सीओक ली यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यापासून झालेली सुरुवात राज्य, देश आणि आता जागतिक पातळीवर काम करायची मिळालेली संधी याचा नक्कीच फायदा घेऊन खेळाचा विकास कसा होईल यासाठी झोकून काम करेल असा विश्वास संदीप ओंबासे यांनी व्यक्त केला.

आपली रेल्वेमधील अधिकारी पदाची नोकरी सांभाळत त्यांनी तायक्वांदो या खेळामध्येही चमक दाखवली आहे. तायक्वांदो या खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून आपल्या खेळामधील विविध पैलुंचे प्रदर्शन करत सुवर्ण कामगिरी केली आहे. 1994 ला जर्मनी (वेसेल ) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे मणीपूर ( इम्फाळ ) येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. आतापर्यंत 22 राज्यस्तरीय, 8 राष्ट्रीय, 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सध्या ते तायक्वांदो असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्र महासचिव आणि तायक्वांदो ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो खेळाडू तयार झाले आहेत. या खेळाची जागतिक संघटना वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन या संघटनेच्या जागतिक कॉन्फरन्ससाठी 2016 ला रशिया येथे भारतातुन संदीप ओंबासे यांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला होता. या खेळासाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सेंट्रल रेल्वेच्या वतीने रेल्वेगाडीमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार व हल्ला रोखण्यासाठी संदिप ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल रेल्वेने ५० महिला कमांडोचे पथक तयार करून सेंट्रल रेल्वेमध्ये तैनात केले होते. त्या सर्व महिला कमांडोंना तायक्वांडो प्रशिक्षण व प्राथमिक स्वरूपाचा हल्ला रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची बहुमोल कामगिरी श्री. ओंबासे यांनी केली होती. या कामगिरीबद्दल सेंट्रल रेल्वेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

Similar Posts

error: Content is protected !!