इगतपुरी तालुक्यातील रुग्णाला ऑक्सिजन हवाय का ? ; कोविड मदत कक्ष ग्रुपतर्फे १० ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर सज्ज

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
ऑक्सिजन अभावी सध्या अनेक रुग्णांची तडफड होत आहे. यासाठी ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी कुटुंबातील अनेकांचे प्रयत्न आणि मित्रांची धडपड व्यर्थ ठरते. यातही गरीब घरातील रुग्ण असेल तर त्याला ह्याचा सर्वाधिक फटका बसतो. ऑक्सिजन मिळेपर्यंतच्या एवढ्या वेळात संबंधित रुग्णाची अवस्था मात्र मरणासन्न होते. ह्यावर प्रभावी उपाय करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी चांगलाच तोडगा काढला आहे. गोरखभाऊ बोडके युवा फाउंडेशनचे अथक प्रयत्न आणि कोविड मदत कक्ष ग्रुपच्या साहाय्याने आता शेकडो रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. रुग्णांसाठी आपल्या घरातच विनामूल्य ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर यंत्र पुरवण्याची सज्जता पूर्ण झाली आहे. सोमवारी दि. १७ ला रुग्णांच्या सेवेत १० ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर यंत्र अर्पण होणार आहेत.

गोरखभाऊ बोडके युवा फाउंडेशनच्या प्रयत्नांनी आणि कोविड मदत कक्ष ग्रुपच्या सहकार्याने संपूर्ण इगतपूरी तालुक्यात एकूण १० ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर यंत्र सज्ज झाले आहेत. इगतपुरी तालुक्याचे घरच्या घरी आयसोलेशन झालेल्या रुग्णांसाठी हे मशीन ऑक्सिजन पुरवण्यासाठी विनामुल्य दिले जाणार आहेत. यामुळे रुग्णांचा श्वास वाचवण्यासाठी हातभार लागणार आहे.

कोणालाही ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन हवे असतील कोविड मदत कक्ष ग्रुपशी संपर्क करावा असे आवाहन देवदुत माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, कोविड मदत कक्ष ग्रुपचे अॅडमिन तथा माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना केले आहे. ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर हवे असल्यास सोबतच्या बातमीमध्ये असलेल्या पोस्टरवर असलेल्या कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधावा.

उद्या सोमवारी सायंकाळी ५ वाजता घोटी येथे १० ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. कार्यक्रम प्रसंगी घोटीचे प्रभारी सरपंच रामदास भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, ग्रुपचे अॅडमिन हरिश्चंद्र चव्हाण, ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, पत्रकार भास्कर सोनवणे, किरण फलटणकर, माजी उपसरपंच रामदास गव्हाणे, समाधान जाधव, युवासेना शहर प्रमुख निलेश काळे आदी उपस्थित राहणार आहेत.

अनेकांचा जीव ऑक्सिजन अभावी घाबरून जातोच पण अनेकांनाही हादरवून टाकतो. अशा काळात इगतपुरी तालुक्यासाठी परमेश्वरी कार्य करणारे गोरख बोडके आणि हरिश्चंद्र चव्हाण यांनी रुग्णांना प्राणदान करणारे काम केले आहे. घरच्या घरी ऑक्सिजन पुरवणारे १० यंत्र शेकडो रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरतील यात शंका नाही. दोघांचे आणि कोविड मदत कक्ष ग्रुपचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.
- विनोद चव्हाण, माजी उपसरपंच माणिकखांब

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!