इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगांव नंतर आता भावली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत धामडकीवाडी येथील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार धामडकीवाडी येथील ग्रामस्थांनी इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. मालेगांव तालुक्यातील टोकडे आणि इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव, धामडकीवाडी ही दोन गावे चोरीच्या रस्त्यामुळे चर्चेत आली आहेत. आमच्या धामडकीवाडी रस्त्याचा शोध लावावा, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्याकडून वसुली करावी अशा मागण्या निवेदनात आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील भावली खुर्द अंतर्गत धामडकीवाडी येथील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १३ ते १४ लाख रुपये मंजुर झाले होते. मात्र सदर रस्त्याच्या कामात संबंधित अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून काम न करताच मंजूर निधी काढुन घेतला आहे असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. याचा अर्थ आमचा रस्ता चोरी केला असल्याने संबंधित कामाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. असे न झाल्यास आम्ही सर्व ग्रामस्थ आमरण उपोषण करू, रस्त्यावर उतरुन आंदोलनास करु असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगिवले, माजी ग्रामपंचायत सदस्य खेमचंद आगिवले, भारत आगिवले, ग्रामपंचायत सदस्या चांगुणा आगिवले यांच्यासह लुखा भगत, खेमा आगिवले, चिमा आगिवले, गोविंद यशवंत आगिवले, आगिवले, बबन आगिवले, बाळु आगिवले, हरी आगिवले यमजी आगिवले, सिताराम आगिवले, लहानु आगिवले, गंगाराम आगिवले, देवाजी आगिवले, पांडुरंग आगिवले, उल्ल्हास तेलम, मुन्ना तेलम, भिवा भगत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.