इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इंदिरा काँग्रेसच्या नव्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदाच्या निवडीबाबत आमची शंका असून याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आम्ही भेटून स्पष्टीकरण करणार आहोत. आमचा जन्म काँग्रेसमध्ये झाला असून मृत्यूही काँग्रेसमध्येच होईल. ५० वर्षाच्या पक्षकार्यात अनेक चढउतार पाहिले असून पक्षाला आम्हीच मजबूत केलेले आहे. ज्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, पक्षात असतांना पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले अशा व्यक्तींनी आम्हाला बोध शिकवू नये. जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून आदेश मिळत नाही तोपर्यंत इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणून रामदास धांडे हेच काम पाहणार असल्याचे अधोरेखित करतो अशी माहिती काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जनार्दनमामा माळी, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कचरू पाटील शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे दिली आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही तालुके मिळून विधानसभा मतदारसंघ असून त्र्यंबकेश्वरचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांचा याप्रकरणी मत मांडण्याचा हक्क डावलता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
लहानपणापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी अंगावर आल्यानंतर त्या दिवसापासून सक्रीयतेने अखंड काम करीत आहे. आमदारकीच्या निवडणुकीत माझ्या नेतृत्वाखाली विजय खेचून आणला. येणाऱ्या निवडणूकीत सुद्धा भरघोस यश मिळवण्यासाठी कटिबद्ध आहे. मला पदाचा कधीच मोह नव्हता आणि कधीही नसेल. माझ्या हातात प्रदेशाध्यक्षांकडून अधिकृत आदेश येत नाही तोपर्यंत तालुकाध्यक्ष म्हणून माझ्यावरील जबाबदारी पार पाडणे माझे मोठे कर्तव्य असल्याचे मी समजतो. याबाबत लवकरच प्रदेश नेत्यांची भेट घेणार आहे.
- रामदास धांडे, तालुकाध्यक्ष इंदिरा काँग्रेस
ते पुढे म्हणाले की, इंदिरा काँग्रेसमध्ये गेली ५० वर्ष सक्रीयतेने कार्यरत असून अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. पक्षाची वाताहत झालेल्या काळातही आमच्या नेतृत्वाखाली पक्षाला विजयी जागा देण्याचे काम आम्ही केलेले आहे. यासह आजपर्यंत पक्षाच्या बांधणीसाठी आम्ही अविरतपणे कार्य करीतच आहोत. मधल्या काळात पक्षाला वाईट काळ असूनही आम्ही कधीही पक्षाच्या बाहेर गेलो नाही. रामदास धांडे यांच्या निवडीनंतर पक्षाला खरोखर घवघवीत यश मिळाले. त्यांनी कधीही पक्षविरोधी काम केलेले नाही. याबाबतच्या आरोप करणाऱ्यांनी हे सिद्ध करायला पाहिजे. संपतराव सकाळे जेष्ठ नेते असून त्यांनी त्यांचा वरचष्मा नेहमीच सिद्ध करून दाखवलेला आहे. विधानसभा मतदारसंघ एकच असल्याने त्यांना याबाबत बोलण्याचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. नवीन तालुकाध्यक्षपदावरील व्यक्तीने काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याने त्यांची दाखवण्यात आलेली निवड संशयास्पद आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे सुद्धा संभ्रमात आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अद्यापपर्यंत अधिकृत आदेश अथवा पत्र आम्हाला अप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश कार्यकारिणीची भेट घेऊन कैफियत मांडणार आहोत. याबाबतच तिढा थेट दिल्ली पर्यंत जाऊन सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. ज्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, पक्षात असतांना पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले अशा व्यक्तींनी आम्हाला बोध शिकवू नये. जोपर्यंत प्रदेश कार्यकारिणीचा आदेश हाती येत नाही तोपर्यंत इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे हेच आहेत असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.