विविध कंपन्या बँका, उद्योग संस्थांमध्ये नोकरीसाठी मुलाखत महत्वाची मानली जाते. अनेक उमेदवार यात कमी पडतात. आज आम्ही नोकरी मिळविण्यासाठी मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र सांगणारा सक्सेस पासवर्ड ह्या लेखातून देत आहोत.
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३
■ जाहिरातीची माहिती
मुलाखतीच्या अगोदरची पायरी म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी मुलाखत द्यावयाची आहे त्या संस्थेची, कंपनीची शाळेची, विद्यापीठाची, महाविद्यालयाची, बँकेची जाहिरात पाहणे. संबंधित जाहिरात माहित असणे अत्यावश्यक ठरते. जाहिरातीमध्ये नोकरीचे, जागेचे स्वरूप, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व गुणवत्ता, अनुभव, विविध कौशल्यांचे ज्ञान, इतर पात्रता यांची माहिती दिलेली असते. या जाहिराती संकेतस्थळ, वृत्तपत्रे, दूरदर्शन इत्यादी माध्यमांवर प्रसिद्ध होत असतात.
■ माध्यमांचे वाचन
प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींची माहिती होण्यासाठी नियमितपणे समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, संकेतस्थळे यावरील जाहिरातींचे वाचन करणे आवश्यक असते. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेकांनी आपल्या वेबसाइट तयार केल्या आहेत. त्यामुळे आता अत्यंत लहान अशी जाहिरात वृत्तपत्रामध्ये दिली जाते. भरावयाच्या पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय, धनाकर्ष, अटी व शर्ती, कौशल्यांचे ज्ञान इत्यादी गोष्टी संकेतस्थळावर दिलेल्या असतात. यासाठी वृत्तपत्रातील जाहिरातींबरोबरच संबंधित संस्थेचे संकेतस्थळ पाहणे देखील आवश्यक असते.
■ अर्ज तयार करणे
जाहिरातीची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला अर्ज तयार करावा लागतो. अर्जामध्ये एका दृष्टिक्षेपात आपली माहिती, पात्रता, अनुभव, कौशल्यांचे ज्ञान दुसऱ्याला समजणे आवश्यक असते. अर्जामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, जात, प्रवर्ग, संपर्कासाठी मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता, अनुभवाची सविस्तर माहिती, आवड आणि इतर किंवा अधिक माहिती देणे आवश्यक असते. या अर्जातील माहितीमुळे तुमची पात्रता, योग्यता दिसून येते. हे अर्ज आता तीन प्रकारचे असतात. 1. स्वतः उमेदवाराने करावयाचा अर्ज. 2. संबंधित संस्थेचा छापील अर्ज. 3. ऑनलाइन भरून पाठवायचा अर्ज.
■ माहितीची सत्यता
अर्जामध्ये उमेदवाराने सर्व माहिती सत्य आणि खरी देणे गरजेचे आहे. कोठेही खोटी माहिती देऊ नये. इतर पात्रता व अधिक माहितीमध्ये तुम्ही ज्या ज्या क्षेत्रांत प्राविण्य मिळवले किंवा इतर अधिक पात्रता, पदव्या मिळवल्या असतील तर त्यांचा अवश्य उल्लेख करावा. असा उल्लेख करतांना मुलाखतीच्या वेळी आपल्याला त्याचे प्रमाणपत्र अथवा पुरावा दाखविणे आवश्यक असते.
■ मुलाखतीची तयारी
अर्ज केल्यानंतर पुढचा टप्पा अथवा पायरी म्हणजे मुलाखतीची तयारी होय. ही तयारी चांगली असेल तर मुलाखत घेणारे तज्ज्ञांचे पॅनल उमेदवारांच्या निवडीचा विचार करते. मुलाखत यासाठी चांगली झाली पाहिजे. तुमच्याकडे सर्व पात्रता आहे, अनुभव आहे आणि मुलाखतीच्या वेळेस तुम्ही काहीच बोलत नाही किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नसाल तर तुमच्याजवळ असलेल्या शैक्षणिक पात्रतेचा व अनुभवाचा काहीही उपयोग नाही हे लक्षात ठेवा.
■ मुलाखत फुलविणे
ही गोष्ट उमेदवाराच्या हाती असते. विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही चांगल्या प्रकारे व योग्य उत्तरे देत गेलात तर त्यातून मुलाखत घेणारा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतो आणि मुलाखत फुलत जाते. यासाठी एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर प्रामाणिकपणे मला उत्तर येत नाही असे सांगा. खोटे उत्तर देऊ नका. बरेच उमेदवार मुलाखत देण्याच्या वेळी घाबरलेले असतात. मुलाखत देण्याची भीती वाटत असते. म्हणून सर्वप्रथम आपल्यातील न्यूनगंड, भीती काढून टाका.
■ बायोडाटावरील प्रश्न
मुलाखतीमध्ये जवळपास निम्मा भाग हा तुम्ही बायोडाटामध्ये जी माहिती दिलेली आहे त्यावर असतो. यात वेगळे असे काहीच नसते. मुलाखत घेणाऱ्याकडे तुमच्या अर्जाच्या रुपाने सर्व माहिती असते. तरीदेखील त्या माहितीच्या सत्यत्येसाठी, तुम्हाला बोलते करण्यासाठी तुमची अभिरूची, आवड, व्यवसायाबद्दलची निष्ठा, तुमचा संस्थेला, कंपनीला, उद्योग व्यवसायाला होणारा उपयोग, सकारात्मक दृष्टिकोन, तुमची विचाराची दिशा यासंदर्भात प्रश्न विचारले जातात. तुम्ही अर्जामध्ये जन्मतारीख दिलेली आहे. परंतु या माहितीवर मुलाखत घेणारा तुम्हाला तुमचे वय विचारतो. आपल्याला आपले वय लगेच सांगता आले पाहिजे. या प्रश्नात वेगळे किंवा अवघड असे काहीच नाही. तुमची परिस्थिती, वातावरण जाणून घेण्यासाठी बऱ्याच वेळा कौटुंबिक माहितीवरही प्रश्न विचारले जातात.
■ सकारात्मक दृष्टिकोन
मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांचा, उमेदवाराचा सकारात्मक दृष्टिकोन तपासला जातो. त्यादृष्टीने उमेदवाराने प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते. थोडक्यात तुम्ही ज्या क्षेत्रात येऊ इच्छिता त्या क्षेत्राबद्दलची आवड, निष्ठा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे लक्षात असूद्या.
■ मुलाखतीला जाताना
1. मुलाखतीची तयारी चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. तुमच्या मुलाखतीमुळे मुलाखत घेणारा प्रभावित झाला पाहिजे.
2. मुलाखतीमध्ये सामान्यज्ञान, चालू घडामोडी आदी विषयांवर देखील प्रश्न विचारले जातात. त्यासाठी दैनंदिन घडणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वाचन तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल.
3. सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची फाईल घेऊन जा.
4. मुलाखतीला आनंदाने सामोरे जा. कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका.
5. मुलाखतीसाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी करुन ठेवा.
6. प्रश्नांची चुकीची उत्तरे देऊ नका.
( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयात उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत )
8 Comments