देवा माफ कर मानवाला !

कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१

पदरमोड करुन देवा,
उभी केली देवळं !
सालाचं उत्पन्न सारं,
दिलं तुला सगळं !!
आता तरी डोळे उघड,
देवा, कीव येऊ दे तुला !
देवा, चुक केली मानवाने,
आता माफ कर त्याला !!

मानवावर संकट येता,
दार लाऊन बसला !
असा कसा देवा तू,
मानवावर कोपला !!
पण करतो तुला,
देवा, पाव नवसाला !
देवा, चुक केली मानवाने,
आता माफ कर त्याला !!

अवकाळी पावसानं,
पीक सारं सडून गेलं !
दाण्यांनं भरेल कणीस,
सारं मोड येऊन मेलं !!
बळीच्या स्वप्नाचा घात,
देवा, निसर्गाने केला !
देवा, चुक केली मानवाने,
आता माफ कर त्याला !!

चूक झाली मानवाची,
मनी आदर भाव गेला !
स्वार्थापोटी सृष्टीवर,
खूप अन्याय केला !!
विज्ञानाची कास धरुन,
देवा, दूर केलं तुला !
देवा, चुक केली मानवाने, 
आता माफ कर त्याला !!

निसर्गावर मानवाने,
खुप बलात्कार केला !
विषाणूच्या विळख्याने,
मानव हैराण झाला !!
मानवता लोप पाऊण,
देवा, पैसा मोठा झाला !
देवा, चुक केली मानवाने, 
आता माफ कर त्याला !!

जन्मदात्या जीवाला,
बाप म्हणतो त्याला !
डोळ्या देखत त्याचा,
जीव कोरोनाने नेला !!
कुणीचं नाही आलं,
देवा, खांदा देण्या त्याला !
देवा, चुक केली मानवाने, 
आता माफ कर त्याला !!

सुख काय असतं,
हे कळेना मानवाला !
टीचभर पोटासाठी,
तो पाप करत गेला !!
माझं माझं म्हणत,
देवा, जीव निघुन गेला !
देवा, चुक केली मानवाने, 
आता माफ कर त्याला !!

फुकट मिळत होतं पाणी,
मिळत होती गार हवा !
निसर्गाचा कोप झाला,
आता झाडे तुम्ही लावा !!
कुऱ्हाडीनं झाडं तोडून,
देवा, घात तुझा केला !
देवा, चुक केली मानवाने,
आता माफ कर त्याला !!

( कवी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक असून ते संवेदनशील विषयांवर सतत लेखन करतात. त्यांची पुस्तके सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!