इगतपुरीनामा न्युज, दि. 7
समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण, पंचायत समिती इगतपुरी अंतर्गत गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग मुलांचा शिक्षण प्रक्रियेत सर्व सामान्य मुलांबरोबर समावेश करणे हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिव्यांगही सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेऊ शकतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांमध्ये या निमित्ताने आत्मविश्वास निर्माण होईल. सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटी मुले नंबर 2 या ठिकाणी केंद्रातील दिव्यांग व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन सहभाग घेतला. दिव्यांग मुलासंमवेत सामान्य मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले कला कौशल्य दाखविले. सर्वसामान्य मुलांनाही आपल्या वर्गात दिव्यांग मुलगा आहे म्हणून त्याचा तिरस्कार न करता त्याला आपलेसे करून आपल्याबरोबर आपल्या समवेत त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. या स्पर्धेनिमित्ताने दिव्यांग व सर्वसामान्य मुले असा कुठलाही प्रकारचा भेदभाव न ठेवता सर्व मुलांनी उत्तम सहभाग घेतला. शिक्षण विस्ताराधिकारी कैलास सांगळे, रवींद्र पवार, मुख्याध्यापक जहीर देशमुख, केंद्रप्रमुख योगेश भामरे यांनी मुलांना कौतुकाची थाप दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी आयडी विशेष तज्ञ स्मिता खोब्रागडे, उत्तम आंधळे, विशेष शिक्षक बाप्पा गतीर, तापकिरे मॅडम आदी उपस्थित होते.