आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला शुक्रवारपासुन नाशिकमध्ये सुरवात : चार विभागातील शेकडो स्पर्धक होणार सहभागी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – आदिवासी विकास विभागाच्या या शैक्षणिक वर्षातील क्रीडास्पर्धेचे उदघाटन उद्या शुक्रवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र पोलीस ॲकडमी, नाशिक ह्या मैदानावर होत आहे. उदघाटन समारंभाला केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना डॉ. भारती पवार, आदिवासी विकास विभागाचे मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली. नाशिक, नागपुर, अमरावती, ठाणे या चारही विभागातील 911 मुले व 910 मुली असे एकुण 1821 खेळाडु या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. खेळाडुंसोबत चारही विभागाचे 100 पुरुष संघ व्यवस्थापक आणि 100 स्त्री संघ व्यवस्थापकही उपस्थित राहणार आहेत.स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धांचे बक्षिस वितरण 12 फेब्रुवारीला होणार आहे.

राज्यभरात नाशिक, अमरावती, नागपुर व ठाणे या चार विभागांतर्गत विविध शासकिय, अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सहाय्याने प्रकल्प, विभाग, राज्यस्तर अशा तीन स्तरांवर या क्रीडा स्पर्धा प्रत्येक शैक्षणिक वर्षात घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने कबड्डी, खो खो, हॉलीबॉल, हॅण्डबॉल हे सांधिक खेळ, 5000 मी चालणे, 100मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 3000 मी धावणे आणि 4*100 मी व 4*400 मी रिले व भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडी या सारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. क्रिडाविभागाच्या नियमांप्रमाणे प्रत्येक स्तरांवर विद्यार्थ्यांच्या गुणांकनांची पध्दती असुन यामध्ये मिळणारे गुण शासकिय नोकरी, विविध परिक्षांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना महत्वाचे ठरतात.

Similar Posts

error: Content is protected !!