इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव यांची नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी लकी जाधव यांनी 2017 मध्ये आंदोलन केले होते. यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तत्कालीन प्रकल्प अधिकारी अमोल येडगे ( सध्या जिल्हाधिकारी यवतमाळ ) यांनी लकी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 353, 427, 34 आणि महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा कलम 3, 4,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानुसार नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी लकी जाधव यांना निर्दोष मुक्त केले आहे. कायदेतज्ज्ञ योगेश उगले यांनी लकी जाधव यांना कायदेशीर साहाय्य केले.