इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल आज लागले आहेत. यामध्ये पहिल्याच प्रयत्नात स्वराज्य संघटनेला अपेक्षित यश मिळाले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात ८९ ग्रामपंचायत सदस्य व १३ थेट सरपंच म्हणून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते निवडुन आले आहेत. यामध्ये कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, बीड, लातूर, अहमदनगर, परभणी, रायगड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि सहकारी संस्था निवडणुकीचे “स्वराज्य” संघटनेने सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यामध्ये आम्ही निश्चितच मोठे यश संपादन करू असा विश्वास स्वराज्य संघटनेचे निमंत्रक डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी व्यक्त केला. स्वराज्य संस्थापक युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या कौशल्यदायी मार्गदर्शनाने छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेली राजकीय व्यवस्था प्रत्यक्षात यायचा श्रीगणेशा झाला आहे. युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी विजेत्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचेही डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी सांगितले.
स्वराज्य संघटना सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यानुसार स्वयंस्फूर्तीने स्वराज्य संघटनेच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेत आहेत. लोकांचा त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वराज्य संघटनेने राजकारणात यावे अशीच इच्छा लोकांची असल्याचे दिसून येते. यातून अधिक जोमाने काम करण्याची उर्जा आम्हा सर्वांना मिळत आहे. जे लोक आमच्या सोबत आहेत आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहू.
- स्वराज्य संस्थापक युवराज संभाजी राजे छत्रपती