
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – मदतीची गरज असतांना समाजाकडून डोळेझाक झाल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडल्याने शेवटचा टोकाचा मार्ग पत्करायला निघालेल्या युवकाला जगण्याचा मोठा आधार लाभला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा इगतपुरी तालुक्याचे आरोग्यदूत गोरख बोडके यांच्या मदतीने अपघातग्रस्त वीज कर्मचारी अमोल जागले या युवकावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. ह्या कामासाठी मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. तरल यांनीही बहुमोल साहाय्य केले. मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च गोरख बोडके आणि डॉ. तरल यांनी स्वतः केला. जनसेवेचे व्रत नसानसात भिनलेले आरोग्यदूत गोरख बोडके यांच्या मदतीमुळे दुर्लक्षित वीज कर्मचारी अमोल जागले यांचा पुनर्जन्म झाला आहे. ह्या मदतीसाठी अमोल जागले, त्यांचा मित्रपरिवार आणि विविध पदाधिकाऱ्यांनी गोरख बोडके यांचे ऋण व्यक्त केले आहेत.
क्षमतेपेक्षा जास्तच लोकसेवा करणाऱ्या अमोल जागले ह्या कर्मचाऱ्याचा विजेच्या खांबावर काम करतांना अपघात झाला होता. इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत सेवा करतांना लोकांच्या सेवेसाठी त्यांनी जीव ओतून काम केले होते. अशा स्थितीत अल्प उत्पन्न असल्याने वैद्यकीय उपचारासाठी खिसा रिकामा झाला. या कामासाठीही जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा आरोग्यदूत गोरख बोडके यांनी मदत केली होती. अपघातात अमोल जागले यांचा एक पाय काढण्यात आला. भाजल्यामुळे शरीरावर अनेक ठिकाणी प्लास्टिक सर्जरी करणे आवश्यक होते. मात्र यासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च कुठून आणायचा असा प्रश्न अमोल जागले यांना पडला. याचे उत्तर सापडत नसल्याने अमोल जागले नैराश्याच्या गर्तेत सापडले. टोकाचा निर्णय होईल अशा प्रकारचा नकारात्मक व्हिडिओ काढून त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर फोटोसह टाकला. अमोल जागले यांच्या मित्राने जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांना याबाबत माहिती दिली. आरोग्यदूत गोरख बोडके यांनी तातडीने अमोल जागले यांना प्लास्टिक सर्जरीसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा आरोग्यदूत गोरख बोडके, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. तरल यांनी ह्यासाठी झालेला लाखोंचा खर्च स्वतः केला आहे. ह्यामुळे अमोल जागले यांना नवा जन्म लाभला आहे. गोरख बोडके यांच्या सेवाभावी कार्याचे इगतपुरी तालुक्यात कौतुक सुरु आहे.