इगतपुरीनामा न्यूज, दि. 21
मॅरेथॉन स्पर्धा जीवनाला कलाटणी देतात. ह्या क्रीडा प्रकारात निरामय आरोग्याची गुरुकिल्ली लपलेली आहे. शहिदांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी माजी सैनिक भाऊसाहेब बोराडे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा सर्वांना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले. मुंबईमध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय शहिद मॅरेथॉन स्पर्धेसाठी बनवलेल्या विशेष टी शर्टचा शुभारंभ इगतपुरीत संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
त्यांनी पुढे सांगितले की इगतपुरी तालुक्यात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा देशाला सर्वोत्तम खेळाडू देण्यासाठी उपयुक्त ठरतील. यासाठी स्पर्धकांनी जोमाने सहभाग घ्यावा. संत गाडगेबाबा स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत दरवर्षी भर थंडीत शेकडो चिमुकल्यासह आबालवृद्धही धावत असतात.ह्यावर्षी स्पर्धेचे 12 वे वर्ष आहे. उंबरकोन येथे ही स्पर्धा 26 नोव्हेंबरला पार पडणार आहे. कार्यक्रमावेळी माजी सैनिक भाऊसाहेब बोराडे, महिंद्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी तथा माजी सैनिक हरीश चौबे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. 26 नोव्हेंबरला मॅरेथॉन स्पर्धा भव्य प्रमाणात संपन्न होणार असून ह्या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन महिंद्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी तथा माजी सैनिक हरीश चौबे यांनी यावेळी केले.