देशातील लोकप्रतिनिधींसाठी आ. सत्यजीत तांबेंचा नवा पायंडा : १०० दिवसांच्या कार्यकाळाचे मूल्यमापन सर्वेक्षणाद्वारे करणारे पहिलेच आमदार : ११ हजार ६२० मतदारांनी दिला सर्वेक्षणाला प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज –  लोकशाहीत मतपेटीच्या मार्गाने निवडून आलेला प्रत्येक नेता हा लोकांना उत्तरदायी असतो, असं म्हणतात. आमदार सत्यजीत तांबे यांनी मात्र हे वचन आपल्या कृतीतून सिद्ध केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या आ. तांबे यांनी आपल्या आमदारकीचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर तातडीने एक सर्वेक्षण घेतलं. त्याआधी त्यांनी आपण १०० दिवसांत केलेल्या कामाचा लेखाजोगा मतदारांसमोर मांडला. अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसह इतरही काही ठिकाणच्या तब्बल ११ हजार ६२० लोकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. विशेष म्हणजे यापैकी ८७.१५ टक्के मतदारांनी आ. तांबे यांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. ६.२५ टक्के लोकांनी काम बरं असल्याचे नमुद केले. उर्वरित ६.६ टक्के लोकांनी कामात सुधारणा व्हावी असे मत नोंदवले. आपल्याकडे एखादा राजकीय नेता कोणत्याही निवडणुकीत निवडून आल्यानंतर थेट पुढल्या निवडणुकीच्या वेळी मतदारांसमोर आपण केलेल्या कामाचा आढावा घेऊन जातो. क्वचित केंद्र किंवा राज्य सरकार पहिल्या सहा महिन्यांचा लेखाजोगा लोकांसमोर मांडत असतात. पण एखाद्या राजकीय नेत्याने निवडून आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांतच मतदारांना आपल्या कार्यपद्धतीबद्दल समाधान वाटत आहे अथवा नाही, हे चाचपण्यासाठी सर्वेक्षण केल्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे. म्हणून आ. सत्यजीत तांबे देशात असे पहिलेच आमदार ठरले आहेत.

मतदारांच्या अपेक्षा
५४.८७ टक्के मतदार म्हणतात, आमदारांनी युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं तर महिलांच्या प्रश्नांकडे १५.०८ टक्के लोकांनी लक्ष देण्यासाठी मत नोंदवले आहे. तर १४.८१ टक्के मतदारांना आमदार तांबे यांच्याकडून नगर विकासाच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याच्या अपेक्षा आहेत. त्याशिवाय १५.२५ टक्के लोकांनी इतर विषयांसाठी मत नोंदवले आहे. तसेच बेरोजगारी आणि जुनी पेन्शन योजना यावर नव्या उपाययोजना हव्या, अशा अपेक्षाही मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार असलेल्या सत्यजीत तांबे यांनी स्पर्धा परीक्षा व शिक्षक भरती वेळच्या वेळी हवी, या मागणीसाठी जोर लावावा, असंही मतदारांना वाटतं. तसंच कंत्राटी शिक्षकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा मतदारांनी मांडली.

आ. तांबे यांनी समाजमाध्यमांवरून या वेबसाईटच्या लोकार्पणाची घोषणा करून लोकांनी २५ ते ३० मे पर्यंत सर्वेक्षणात सहभागी व्हावं, असं आवाहन केलं. आपल्या आमदारकीच्या पहिल्या १०० दिवसांबाबत लोकांची काय प्रतिक्रिया आहे, आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचली आहेत का, लोकांना काही सूचना करायच्या आहेत का, अशा सर्वच महत्त्वाच्या बाबींची दखल घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आलं. मागच्या महिन्यातच आमदार तांबे यांनी सुधारित संकेतस्थळ प्रसारित केलं होतं. त्या संकेतस्थळावर आ. तांबे यांच्याबद्दलची माहिती, त्यांनी केलेल्या कामांचा आढावा, आगामी वेळापत्रक, त्यांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्या, अशा गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. या वेबसाईटवर या सर्वेक्षणाची लिंकही देण्यात आली होती. सर्वसाधारण कोणत्याही मोठ्या कंपनीत दर तीन महिन्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा आढावा घेतला जातो. एखादा कर्मचारी किंवा अगदी उच्च पदावरील अधिकारीही कुठे कमी पडत आहे, कोणत्या ठिकाणी जास्त प्रयत्नांची गरज आहे, कुठली कामं उत्तम होत आहेत, हे त्यातून समोर येतं. त्यामुळे सुधारणेला वाव मिळतो. राजकीय क्षेत्रात तर लोकप्रतिनिधीही लोकांना उत्तरदायी असतात. त्यामुळे हे असं सर्वेक्षण व्हायलाच हवं. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लोकांनी केलेल्या सूचनांचा आता गंभीरपणे विचार करून त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा माझा प्रयत्न असेल असं आमदार सत्यजीत तांबे यांनी विशद केलं.

मतदार म्हणतात
एखाद्या आमदाराने ठरावीक काळानंतर सतत मतदारांकडून आपल्या कार्यपद्धतीबद्दल मूल्यमापन करून घ्यावं, ही पद्धत चांगली आहे. राजकारणी मंडळी कायमच लोकांना गृहीत धरत आले आहेत. एकदा निवडून आले की, ते पुन्हा पाच वर्षें मतदारांना तोंड दाखवत नाहीत. मात्र आमदार सत्यजीत तांबे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यांनी ही मोहीम पुढे देखील कायम ठेवावी ही अपेक्षा आहे.
– शैलेंद्र खडके, पदवीधर मतदार, जळगाव

Similar Posts

error: Content is protected !!