इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा आणि आहुर्ली परिसरात विजेचा खेळखंडोबा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. सिंगल फेज ऐवजी डबल फेज विजेची या भागात प्रमुख मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्याकडे शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे श्री. खोसकर आणि बोडके यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये साधकबाधक चर्चा करून 2 दिवसात हा प्रश्न न सोडवल्यास संतप्त शेतकरी कार्यालयात येऊन आमरण उपोषण करतील असा इशारा दिला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी लवकरच शेतकऱ्यांच्या मागणीवर अंमलबजावणी करून विजेचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येईल असे सांगितले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार हिरामण खोसकर आणि गोरख बोडके यांच्याकडे समाधान व्यक्त केले. वीज मंडळाचे मुख्य अभियंता श्री. कुमठेकर, कार्यकारी अभियंता श्री. डोंगरे आदी अधिकाऱ्यांसह ही बैठक झाली. या बैठकीत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी शेतकऱ्यांतर्फे यशस्वी चर्चा करून प्रश्न सुटण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.