इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २६ फेब्रुवारीला संध्याकाळी ५. ३० वाजता धुरू सभागृह, दादर सार्वजनिक वाचनालय येथे मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान – गोरेगाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक दत्ताराम गवस आणि श्रीराम मांडवकर यांना सन २०२१ सालच्या जीवन गौरव पुरस्काराने तर ग्रंथालय चळवळीतील दिवंगत जेष्ठ कार्यकर्ते आणि दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ ‘वाचन चळवळीतील सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार’ अश्विनी पाठक यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमित, शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार, उद्योजक प्रमोद घोसाळकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.
संघाच्या वतीने ४६ वे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अंक म्हणून मनोरंजनकार र का र मित्र स्मृती पुरस्कारासाठी तरुण भारत नागपूर (संपादक-गजानन निमदेव ) याची निवड करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. ‘मराठी माणसांची भाषिक जबाबदारी’ या विषयावर गजानन निमदेव, दैनिक तरुण भारत नागपूरचे मुख्य संपादक आपले विचार मांडणार आहेत. त्याचप्रमाणे दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या याच विषयावरील राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही होणार आहे. का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – तरुण भारत नागपूर ( संपादक-गजानन निमदेव ), पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक – प्रसाद ( पुणे ), गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक – सकाळ अवतरण, पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – ऋतुरंग ( मुंबई ), साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक – चिकू पीक ( पुणे ), वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक – आनंद तरंग ( पुणे ) , जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक – पुढारी दीपस्तंभ ( कोल्हापूर ), कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक – ऋतुपर्ण (पुणे),याशिवाय काही अंकांचा उत्कृष्ट व उल्लेखनीय अंक म्हणून पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला वृत्तपत्रलेखक, साहित्यिक, दिवाळी अंकांचे संपादक आणि मराठी भाषाप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.