जिल्हा जातपडताळणी समितीतर्फे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी सेवा पंधरवडा निमित्त विशेष मोहीम

इगतपुरीनामा न्यूज, दि. 22

17 सप्टें ते 2 ऑक्टो या कालावधीत “सेवा पंधरवडा” अंतर्गत राज्यातील 2022-23 या शैक्षणिक वर्षात 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी देण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी कालबध्द कृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नाशिक जिल्ह्यात विज्ञान शाखेत प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी देण्यासाठी CCVIS प्रणालीनुसार जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन करणेसाठी नाशिक जिल्ह्यातील प्राचार्य व कर्मचारी यांच्यासाठी “ऑनलाईन वेबिनारचे” आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी आवश्यक कागदपत्र, ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक समिती अधिकाऱ्यांच्या वतीने सहभागी पालक, महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र, ऑनलाईन अर्ज कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ह्या वेबिनारसाठी 100 पेक्षा जास्त विद्यार्थी/पालक सहभागी होते. या सेवा पंधरवडा अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व जात प्रमाणपत्र निर्गमित करणारे सक्षम प्रधिकारी यांचे प्रशिक्षण शुक्रवारी 23 सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी देणेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा 28 सप्टेंबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे, आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेज, कॅनडा कॉर्नर, डोंगरे वसतीगृह परिसर, नाशिक येथे घेण्यात येणार आहे, तरी ह्या कार्यशाळेस नाशिक जिल्हयातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सेवा पंधरवडा निमित्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित कार्यक्रमावेळी समितीच्या अध्यक्ष गीतांजली बाविष्कर, उपायुक्त तथा सदस्य माधव वाघ, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव प्राची वाजे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!