
इगतपुरीनामा न्यूज,दि. ५
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका माधुरी केवळराव पाटील यांना नाशिक जिल्हा परिषदेचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट लेखिका आणि कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध असून त्यांना यापूर्वी राज्यातून विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मोडाळे गावाचा अभिमान वाढला असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी सांगितले.
माधुरी पाटील यांच्या यशाबद्धल इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, मोडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सोसायटी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इगतपुरी तालुक्यातून फक्त त्यांना पुरस्कार मिळाल्याने शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे अभिनंदन सुरु आहे.

