सर्व व्यवस्था सलाईनवर येण्यापूर्वी कोरोनाचे नियम पाळणे महत्वाचे

लेखन : स्वप्निल पाटील, त्र्यंबकेश्वर

सध्या लॉकडाऊन होणार की नाही यावर खलबतं सुरु आहे. लॉकडाऊनचा फटका सर्वांनाचा बसतो हे आपण मागील वर्षी पाहिले. म्हणून लॉकडाऊनला जवळपास सर्वांचाच विरोध आहे. राजकीय पक्षांना तो राजकारणाचा मुद्दा असेल पण लोकांचा जीव आज महत्वाचा आहे. आजची स्थिती पाहिल्यास आरोग्य व्यवस्थेवर, प्रशासनावर आलेला ताण लक्षात घेता किमान १४ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही. खरं तर ही वेळ आता यायला नको होती पण दुर्दैवाने ती आली आहे. त्याला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नाही. गतवर्षी मार्च महिन्यांत लॉकडाऊन लागला होता. तेव्हा देशात फार रुग्णही नव्हते परंतु काळजीपोटी व खासकरुन कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये व सर्वांचे आरोग्य सुरळीत रहावे यासाठी तो लॉकडाऊन होता. अर्थात सर्वांना गाफील ठेऊन तो लावण्यात आल्याने एकूणच जी धावपळ उडाली, मजुरांचे जे हाल झाले ते अत्यंत संतापजनक होते. परंतु आता जवळपास एक वर्ष पूर्ण झाले आहे. अगदी कोरोनाला देशात मुक्कामाला येऊनही वर्षभराचा कालावधी होऊन गेला आहे. मात्र आपण किती सुधारलो ? व्यवस्था किती सुधारली ? असे प्रश्न आजही जैसे थे आहेत. खरं तर आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे पण ते फक्त भूकंप, महापूर, चक्रीवादळ अशा संकटाशी लढण्यासाठी आहे. आरोग्य संकटावर आपण गाफील आहोत व त्यासाठीचे आपत्ती व्यवस्थापन आपल्याकडे नाही. किंबहुना कोरोना संसर्ग महामारीने एक संधी दिली आहे ती म्हणजे आरोग्य व्यवस्थेचे आपत्ती व्यवस्थापन निर्माण करण्याची. पण ती देखील आपण दवडली आहे. कोविड सारख्या महामारीत वर्षभराचा कालावधी मिळूनही आपण आरोग्य व्यवस्थेचे सुनियोजित जाळे निर्माण करण्यास अपयशी ठरलो ही एक शोकांतिकाच आहे. लस बनली, लस मिळाली पण अगदी दोन डोस घेतले तरी कोरोना होत आहे ही देखील चिंता असतांना आपण नियम पाळायला तयार नाही. आरोग्य यंत्रणेचे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न करण्यास तयार नाही. यातून आपल्यासमोर हे संकट यापुढेही उभेच राहणार आहे. आज आपण कोरोना महामारीचा विचार करत आहे. पण त्याबरोबर इतर आजारांशी देखील लोक लढत आहे. अशा लोकांना देखील रुग्णालयात वेळेत उपचार मिळणे गरजेचे आहे. पण कोविडमुळे त्यांची देखील हेळसांड होत आहे. कोरोना संसर्गाचा विचार केल्यास सध्या जेवढे रुग्ण आहेत त्यांचीच सुयोग्य आरोग्य व्यवस्था आपण करु शकत नाही ही जमिनीवरची वस्तुस्थिती आहे. मग विचार करा ती रुग्ण संख्या दुप्पट आणि तिप्पट झाली तर अवस्था काय होईल ? कारण आरोग्य संकट आले तर त्यासाठीची पुरेशी व्यवस्था निर्माण करण्यात आपण कमी पडलेलो आहोत. आज नुसता नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास आजच्या तारखेला नाशिक जिल्ह्यात सरासरी ४० हजार रुग्ण कोविड संसर्ग झालेले आहे। त्यातील अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण फार नाही पण ते जेवढे रुग्ण आहेत आपण त्यांचीच व्यवस्था नीट करु शकत नाही. ज्यांना ऑक्सीजन बेड हवे ते उपलब्ध करुन देऊ शकत नाही. ते बेड लावले तरी त्या रुग्णांकडे लक्ष देता येईल असे वैद्यकिय प्रशिक्षित मुनष्यबळ आपल्याकडे नाही. मग विचार करा फक्त नाशिक जिल्ह्यात ती संख्या ४० हजार ऐवजी ती दुप्पट किंवा तिप्पट झाली तर किती चिंताजनक परिस्थिती उद्भवेल याचे चित्र फक्त डोळ्यासमोर उभे करा. आज जे रुग्ण आहेत त्यांना वेळेत उपचार मिळत नाही, वेळेत रेमडिसिव्हीर नांवाचे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. मग त्यापेक्षा अधिक रुग्ण झाले तर स्थिती काय असेल याचा विचार करुन भानावर या. सरकारी रुग्णालये हाऊसफुल आहेत तर खासगी रुग्णालयांमध्ये काही लाखांचा खर्च अर्थात अगदी पाच दहा लाख रुपये खर्च करुनही अनेकांना आपली माणसे गमवावी लागली हे देखील भयानक चित्र आहे. एका जिल्ह्यात ही अशी केविलवाणी अवस्था मग राज्य आणि देशात काय चित्र असेल. याशिवाय गेल्या वर्षभराचा विचार केल्यास आरोग्य व्यवस्था नुसती राबत आहे. त्यांना थोडी तरी विश्रांती हवी आहे. ती विश्रांती देणे आज गरजेचे आहे. मुळातच वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ तुटपुंजे आहे. त्यात कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या, थोडे इकडचे तिकडे झाले की आधी वरिष्ठ, पुढारी आणि रुग्णाच्या नातेवाईकांचा त्रास होत असतो. तरी ते लोक प्रयत्न करीत आहेत, अर्थात त्यातही काही कामचुकार आहेत पण जे रात्रंदिवस काम करत आहेत, लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचा विचार आपण करायलाच हवा. सध्या रुग्णसंख्या विस्फोटक नसली तरी लोकसंख्येचा विचार केल्यास अत्यंत अल्प प्रमाणात असूनही आपली एकूणच अवस्था बिकट झाली आहे. आपण सर्व बेसावध होतो व पुन्हा बेसावधच राहिलो, त्याचे परिणाम भोगत आहोत. उपचार करुनही रुग्ण दगावत आहेत आणि आता स्मशानातही ताण वाढला असे चित्र आपण पाहत आहोत, कारण वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन कधी आपण नीट बघितलेच नाही व संधी मिळूनही त्यावर फार काही केले नाही. भारताचा विचार सोडा जगात असे अनेक देश आहेत त्यांनी कोरोना संसर्ग महामारीत प्रभावी उपचार नसतांनाही केवळ नियम पाळून कोरोना संसर्ग रोखला. मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी अगदी कोणत्याही दुकानात गर्दी न करता शारिरीक अंतराचे नियम पाळणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे हे तीन नियम पाळून त्यांनी कोरोना रोखला आणि आपल्याकडे रुग्ण रोज वाढत असतांना आपण मात्र अगदी त्या विरुद्ध वर्तवणूक करित आहोत. आपण अंग झाकण्यासाठी कपडे घालतो तसेच कोरोनामुळे मास्क हा आपल्या दैनंदिन कपड्यांचा भाग बनला आहे व नाक आणि तोंडावाडे होणारा संसर्ग रोखण्यासाठी ते सुरक्षीत अस्त्र आहे व ते वस्त्र व्यवस्थीत व गंभीरपणे वापरले पाहिजे हा छोटा नियम आपण पाळत नाही. मास्क आपण फक्त देखावा म्हणून नाकाच्या खाली, तोडाच्या खाली लावतो यातून काय संरक्षण होणार. एकूणच परिस्थिती गंभीर आहे, आज आरोग्य व्यवस्था दमली आहे त्या आरोग्य व्यवस्थेला किमान थोडा दिलासा देणे आवश्यक आहे. साखळी तोडणे आवश्यक आहे, १४ दिवस म्हणजे दोन आठवडे ते आगामी काळातील संकट कमी करण्यासाठी खूप आवश्यक आहे. आज आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत अगदी अल्प रुग्ण असतांना व्यवस्था कोलमडून पडली आहे. रुग्णालयात वेटींग आहे पण दगावलेल्या रुग्णांचा अंतीम प्रवासही वेटींगवर आहे, यातून जरा भानावर या ! वस्तुस्थिती पहा !! आपण कालपर्यंत आपल्या आजुबाजुच्या रांगा, विविध ठिकाणांच्या रांगांच्या बातम्या पाहत होतो, वर्तमानपत्रात फोटो पाहत होतो पण आज अमरधाममधील रांगा व फोटो पाहत आहोत ते खूपच भयानक आहे व केवळ नियम न पाळल्याने व आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष न दिल्याने ती वेळ आपल्यावर आली आहे. जे आज होतय ते आपल्याला नको असेल तर क्षणोक्षणी नियम पाळा, आपली व्यवस्था तोकडी आहे याचे भान ठेवा, लॉकडाऊन हा छोटा उपाय आहे, आपल्याला सावध करण्यासाठी, सजग करण्यासाठी त्याकडे सकारात्मक पहा लॉकडाऊनमुळे नुकसान होणार हे नक्की आहे पण नियम पाळून दैनंदिन व्यवहार केले तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. नियम नाही पाळले तर करोना वाढतच राहणार आणि आपल्याला वारंवार लॉकडाऊनला सामोरे जावेच लागणार, सध्या अनेक देशात तशीच स्थिती आहे. आपल्याला तशी स्थिती नको असेल तर नियम पाळा, नवीन छोटा लॉकडाऊन येणार हे नक्की आहे, पण तो संपल्यावर नियम पाळा, दुसरे नियम पाळतील त्यासाठीही सजग रहा आणि जमलं तर आरोग्य आपत्ती व्यवस्थापनात काही करता येतं का यासाठीही  एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून सजग रहा…. नाही तर आजच्या पेक्षा भयंकर स्थिती निर्माण होईल आणि आपण काहीही करु शकणार नाही… आज छोट्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही पण येथून पुढे तरी सावध रहा. ( लेखक गेल्या 15 वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथील विविध विषयांवर लेखन करतात. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीचा विकास, येथील समस्या, लोकांच्या व भाविकांच्या गरजा यावर त्यांचे विचार प्रसिद्ध आहेत. )

Similar Posts

Comments

Leave a Reply

error: Content is protected !!