
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष, चंद्राचीमेट आदी गावांमध्ये बोगस बंगाली डॉक्टरांसह पदवी नसलेल्या डॉक्टरांनी मोघमपणे लोकांवर उपचार सुरू केले. हे लोक राजेरोसपणे आपला दवाखाना सुरू करून कोरोनाची लक्षणे असलेले रुग्णावर देखील उपचार करत होते. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट थांबवावा यासाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. ह्या तक्रारीनुसार चौकशी सुरू झाल्याने संबंधितांचे धाबे दणाणले. म्हणून संबंधित गावाच्या उपसरपंचाने धमक्या देण्याचे सत्र सुरू केले आहे. डहाळेवाडी येथील काही लोकांनी तर तू घरी थांब आम्ही तुझा बेत बघतो अशी धमकी भगवान मधे यांना दिली आहे. याबाबत भगवान मधे यांनी घोटी पोलिसांकडे दूरध्वनीवरून तक्रार केली आहे.
याबाबत भगवान मधे यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध गावांमध्ये बोगस डॉक्टर असून रुग्णांवर मनमानी पद्धतीने उपचार करतात. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका असल्याचे दिसून आले. ह्या डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चौकशीचे आदेश देत चौकशी सुरू केली. चौकशीकामी संबंधित ग्रामपंचायतींनी डॉक्टरांना दिलेल्या नोटिसींना केराची टोपली दाखवली गेली. याबाबत पुन्हा तक्रार केल्यावर त्र्यंबकेश्वरचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी त्या सर्व डॉक्टरांना नोटीसा काढल्या. त्यानंतर या बोगस डॉक्टरांची पळापळ सुरू झाली. ह्या बोगस डॉक्टरांनी संबंधित गावचे उपसरपंच यांना हाताशी धरून भगवान मधे यांना धमकी देण्याची मोहीमच सुरू केली आहे. डॉक्टरची तक्रार केली आता आम्ही घरावरच मोर्चा आणतो असा दम श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. घोटी पोलीस स्टेशनमध्ये फोनवर संपर्क करून धमक्या देणाऱ्यांविरोधात तक्रार केली असल्याचे भगवान मधे यांनी सांगितले.